सांगली

आले पिकास आले अच्छेदिन

दिनेश चोरगे

कडेगाव; रजाअली पिरजादे : आले बियाणे व पिकाला तीन वर्षे चांगला दर मिळाला नाही. मात्र यावर्षी आले बियाणाला नऊपट, तर आल्याला आठपट दर मिळाला आहे. यावर्षी दरात चांगलीच तेजी आली आहे. आले बियाण्यास प्रतिगाडी (500 किलो) 35 ते 36 हजार रुपये दर निघाला आहे. दरम्यान, बियाण्याचा दर वाढणार असल्याने आले पिकाच्या भांडवली खर्चात वाढ होणार आहे.

कडेगाव तालुक्यासह सांगली व सातारा जिल्ह्यात आले लागवडीच्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू झाली आहे. आले लागवडीपूर्वी बियाणे ढेप लावून बंदिस्त करून सावलीत ठेवले जाते. यासाठी बियाणे एक ते दीड महिना अगोदर खरेदी करावे लागते. सध्या लागवडीसाठी बियाणे खरेदी सुरू झाली आहे. पाणी, जमीन, वातावरणातील बदल केल्यास उत्पादनात वाढ होत असते. यासाठी आजूबाजूच्या गावातून, तसेच सातारा व छत्रपती संभाजीनगर येथून बियाणे आणले जाते. बियाणे निरोगी असेल, तर आल्यास मूळकूजचा धोका कमी होतो. यामुळे बियाणे खरेदी करणार्‍या प्लॉटची प्रगतशील शेतकर्‍यांकडून प्रत्यक्ष पाहणी करून निरीक्षणे ठेवली जातात.

मागील दोन ते तीन वर्षात आल्याचे दरात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे आले उत्पादक शेतकर्‍यांत मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र चालू वर्षी आले पिकाने दरात चांगलीच उचल घेतली आहे. उत्पादक शेतकर्‍यांत मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला जात आहे. बाजारभाव 30 ते 32 हजार रुपये प्रति पाचशे किलो, तर बियाणांचा भाव 35 हजार ते 36 हजार रुपये प्रति पाचशे किलो आहे.

मागील वर्षी लहरी वातावरणाचा मोठा फटका आले पिकास बसला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मूळकुजीचा प्रादुर्भाव झाला. अनेक शेतकर्‍यांनी आले काढून विक्री केली. त्यामुळे आले पिकांचे शिल्लक क्षेत्र कमी आहे. सध्या धुणीचा ( खाण्यास लागणारे) आले पिकांच्या दरात चांगलीच सुधारणा सुरू आहे. खोडवे पिकालाही चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आहे.
– दीपक शेडगे, प्रगतशील शेतकरी

मागील दोन ते तीन वर्षे आले अवघे 5 ते 7 हजार रुपये प्रतिगाडी (500 किलो) या दराने विक्री केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला होता. यावर्षी 35 हजार रुपये प्रतिगाडी बियाणे विक्री झाली आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे. शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी.
– डी. एस. देशमुख, आले उत्पादक शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT