जिल्ह्यात सगळीकडे दीपावलीचा उत्साह आहे. 
सांगली

आजही लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त : साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

दिवाळीचा झगमगाट, सारा आनंदी थाट

पुढारी वृत्तसेवा

सांगली : दिवाळी हा सर्वांच्या जीवनात प्रकाश, आनंद आणि नवचैतन्य घेऊन येणारा सण! जिल्ह्यात सगळीकडे दीपावलीचा उत्साह आहे. दिवाळीचा झगमगाट, सारा आनंदी थाट... असा माहोल आहे. गुरुवारी अभ्यंगस्नान करून एकमेकांच्या घरी फराळ देण्याची लगबग सुरू होती. घरे व आस्थापनांवर, मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. घराघरांत रांगोळ्या काढल्या जात आहेत. दीपावलीनिमित्त गुरुवारी पहिल्या दिवशी नरक चतुर्दशी तसेच आश्विन शुक्ल अमावास्येनिमित्त काही ठिकाणी लक्ष्मीपूजनदेखील करण्यात आले. अनेक ठिकाणी आज शुक्रवारीही लक्ष्मीपूजन होणार आहे.

श्रीराम वनवासातून परतल्याचा आनंददायी सोहळा म्हणजे दीपावली. देव आणि दैत्यांमधील समुद्रमंथनामध्ये जी नवरत्ने बाहेर आली, त्यातील एक रत्न म्हणजे लक्ष्मी. समुद्रमंथनात याचदिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली. याचदिवशी देवीने नरकासुराचा वध केला. याचा आनंद म्हणून यादिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. हिंदू धर्माप्रमाणे आश्विन प्रतिपदेला दुर्गादेवीची स्थापना केली जाते. नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो. यानंतर येणार्‍या अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. यावर्षी तिथीक्षय झाल्याने नरक चतुर्दशी व अमावास्या एकाच दिवशी आली. तसेच दुसर्‍या दिवशीही अमावास्या असल्याने लक्ष्मीपूजन दोन दिवस करण्यास हरकत नसल्याचे पुरोहित रविकांत जोशी यांनी सांगितले.

नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे काही लोकांनी पहिल्याच दिवशी लक्ष्मीपूजन केले. सांगलीतील वखारभाग, खणभाग, कापडपेठ तसेच परिसरात लक्ष्मीपूजन दुपारी तीन वाजल्यापासून दुकानात, व्यवसायाच्या ठिकाणी, कार्यालयात तसेच घरामध्येही लक्ष्मीपूजन केले. काही नागरिक दुसर्‍या दिवशी म्हणजे आज लक्ष्मीपूजन करणार आहेत. लक्ष्मीपूजेनिमित्त मंगलमय वातावरण तयार झाले होते. दिवाळीतील धार्मिक विधींसाठी पूजासाहित्य, फुले, भेंडबत्तासे, कुबेर-लक्ष्मीचे फोटो आदी खरेदीला बुधवारी रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. रांगोळी, ऊस, नारळाच्या झावळ्या, पूजेस लागणारे साहित्य, पणत्या, मिठाई, फळांच्या दुकानांत खरेदीसाठी गर्दी होती. यामुळे बाजारपेठ फुलून गेली होती. घरा-घरात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत दिवाळीचा आनंद साजरा करत आहेत.

शनिवारी बलिप्रतिपदा (पाडवा), तर रविवारी भाऊबीज

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दिवाळी पाडवा शनिवारी साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने व्यापार्‍यांचे वहीपूजन होणार आहे. सकाळी 8.07 मिनिटांपासून ते 9.32 पर्यंत, दुपारी 1.47 पासून 4.37 पर्यंत, सायंकाळी 6.03 पासून 7.37 पर्यंत, तर रात्री 9.12 मिनिटांपासून 12.22 मिनिटांपर्यंत मुहूर्त आहेत.

लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त

दिवाळी सणातील एक महत्त्वाचा सोहळा म्हणजे कुबेर-लक्ष्मीपूजन. गुरुवारी दुपारी 3 पासून दर्श अमावास्या सुरू होत असल्याने लक्ष्मीपूजन केले तर चालते. तसेच शुक्रवारी सकाळी 7.56 ते 9.18 पर्यंत लाभ, 9.18 ते 10.41 पर्यंत अमृत, तर 10.41 ते 12.04 पर्यंत शुभ आणि सायंकाळी 6.04 मिनिटांपासून रात्री 8.35 पर्यंत, तसेच रात्री 9.12 पासून 10.47 पर्यंत आणि उत्तररात्री 12.22 पासून 3.32 मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनासाठी शुभवेळ आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT