बागणी (ता. वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व कै. मुकुंदराव शंकरराव दाभोळे यांचा शनिवार दि. 4 जून 2022 रोजी प्रथम स्मृतिदिन होत आहे. यानिमित्त… कष्टातून सगळ्यांना यश मिळतेच असे नाही. मात्र याला कदाचित स्व. दादा अपवाद असावेत. दादांचे वडील शंकरराव सखाराम दाभोळे (नाना) हे जुन्या पिढीतील नामांकित पैलवान! नानांच्या शिस्तीत दादांचे बालपण घडत गेले. नानांची शिकवण दादांनी आयुष्यभर जपली.
एकुलते एक सुपुत्र म्हणून नानांनी कधी दादांचे अवाजवी लाड केले नाहीत. दादांनी बालपणी अपार कष्ट घेतले. परिस्थितीचे झेललेल्या घावांची त्यांनी नेहमीच जाणीव ठेवली होती. नियतीने दादांना पाच रुपयांची फी भरणे शक्य नव्हते म्हणून शाळा सोडणे भाग पाडले, मात्र त्याच नियतीने दादांना भरभरून दान दिले.
दादा शिकले असते तर नक्कीच एक चांगले शिक्षक, अधिकारी झाले असते. सन 1970 मध्ये दादांचा विवाह झाला. यानिमित्ताने बड्या घराशी नातेसंबंध झाले. सन 1983-84 च्या दरम्यान दादांनी जमिनी खरेदी केल्या, ट्रक घेतला. दादांचा एक खास गुण म्हणजे दादांचे असलेले अफाट वाचन! वाचनाने एखादी व्यक्ती कशी घडते, याची प्रचिती दादांकडे पाहून आल्याखेरीज राहत नव्हती. दादा मनाने अत्यंत भावनाशील आणि संवेदनशील स्वभावाचे होते. दादांची नात निशा हिचे दहा वर्षांपूर्वी अचानक निधन झाले. त्यावेळी दादा एखाद्या पहाडासारखे सर्व कुटुंबीयांना आधार देते झाले.
हे सारे आठवले म्हणजे अगदी वारुळातून मुंग्या बाहेर याव्यात तसे सारे आठवते. मन गलबलून जाते. अगदी हत्तीसारखे दादा आम्हाला इतक्यात सोडून जातील असे कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते. आता केवळ दादांच्या आठवणी आणि त्यांनी दिलेला स्वाभिमान!
– प्रा. राजेंद्र वंजाळे, बागणी