सांगली

अंकली-मिरज महामार्गाबाबतचा अहवाल फेटाळला

backup backup

सांगली : पुढारी वृत्तसेवा येथील अंकली ते मिरज या महामार्गावर नव्याने झालेल्या रस्त्याच्या बांधकामामुळे महापुराची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर ठिक-ठिकाणी बोगदे तयार करण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली होती. मात्र, ती मागणी फेटाळण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा आणि तिच्या उपनद्यांना सलग महापूर येत आहे. महापुराचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे यंदाही पूर येणार की काय, याची धास्ती नदीकाठावर राहणार्‍या लोकांच्यात आहे. त्यातच यावेळी नदीपात्रामध्ये अनेक पूल आणि रस्त्याच्या निमित्ताने नदीमध्ये भराव टाकण्यात आलेला आहे. त्याशिवाय अंकली ते मिरज यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम यावर्षी करण्यात आले आहे. या महामार्गासाठी रस्त्याची उंची वाढवण्यात आलेली आहे. महापुरामुळे पाणी आल्यास या भिंतीला अडथळा होऊन पाणी मोठ्या प्रमाणात सांगली शहरात येईल. अगदी ते सांगली मिरज रस्त्यापर्यंत येईल, अशीही भीतीयुक्‍त चर्चा लोकांच्यात आहे.

या संदर्भात अंकली, धामणी, हरिपूर येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. आंदोलनानंतर या कामाची पाहणी करण्यासाठी पाटबंधारे आणि बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची समिती गठित करण्यात आली होती. या समितीने रस्त्यावर पाहणी केली होती. त्या प्रमाणे ज्या ठिकाणी पाईप आहेत, त्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी मोठे बोगदे काढण्यात यावेत, अशी मागणी करणारा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे जिल्हा प्रशासनाने पाठवला होता. मात्र, हा अहवाल या विभागाने फेटाळला आहे.

अंकली ते मिरज या महामार्गावर बांधकामामुळे पाण्याचा अडथळा होईल का, याचे तातडीने फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांनी दिलेले आहेत. महामार्गावर पाईपच्या जागी बांधीव बोगदे काढण्यात यावेत, अशी मागणी केंद्राकडे पुन्हा एकदा केली आहे.

SCROLL FOR NEXT