एरंडोलीत शस्त्राने वार करून तरुणाचा खून  File Photo
सांगली

एरंडोलीत शस्त्राने वार करून तरुणाचा खून

करण शिंदे

मिरज : पुढारी वृत्तसेवा

एरंडोली (ता. मिरज) येथे तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. प्रमोद वसंत जाधव (वय 32) असे तरुणाचे नाव आहे. अनैतिक संबंधातून त्याचा खून झाला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. परंतु खुनाचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नव्हते. प्रमोद जाधव हा एरंडोली येथील जाधव वस्तीवर राहण्यास होता. त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त होत आहे. प्रमोद हा मंगळवारी सायंकाळी आरग रस्त्यावर असणार्‍या शाबू कारखान्याजवळ गेला होता. त्यावेळी त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या हल्लेखोरांनी त्याला गाठून धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला चढविला. त्याच्या मानेवर आणि छातीवर हल्ला केल्याने अति रक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले.

दरम्यान, सायंकाळी घरातून गुरांना चारण्यासाठी बाहेर गेलेला प्रमोद रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी आरग रस्त्यावर असणार्‍या शाबू कारखान्याजवळील झुडपामध्ये त्याचा मृतदेह मिळून आला. प्रमोद याच्या मानेवर आणि छातीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. अत्यंत निर्दयपणे त्याचा खून करण्यात आला. त्यामुळे अनैतिक संबंधातूनच हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यादृष्टीने त्यांनी तपास सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी

प्रमोद जाधव याचा खून झाल्याची माहिती गावात वार्‍यासारखी पसरली. यानंतर गावातील अनेकजणांनी आरग रस्त्यावर असणार्‍या शाबू कारखान्याजवळ घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. प्रमोद जाधव याचा खून कोणत्या कारणातून झाला याबाबत गावात उलट सुलट चर्चा सुरू होती. पोलिसांनी अद्याप नेमके कारण सांगितले नसले तरी हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा एरंडोली गावात सुरू होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT