सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील हरिपूर रस्त्यावरील पाटणे प्लॉटमधील सूरज बाळासाहेब पाटील (वय 30) या तरुणाचे तीन लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. शनिवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत दोन संशयितांना अटक करून सूरजची सुखरूप सुटका केली.
नीलेश बाळासाहेब गालिंदे (30, रा. आनंद टॉकीजसमोर, गावभाग) व मनोज मोहनसिंग दुबे (32, वारणाली, सहावी गल्ली, विश्रामबाग, सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना सोमवार दि. 1 एप्रिल रोजी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. संशयित व अपहृत सूरज पाटील ओळखीचे आहेत. संशयितांना तीन लाख रुपयांची गरज होती. यातून त्यांनी शनिवारी दुपारी दीड वाजता पाटणे प्लॉटमधून सूरजचे कारमधून (एमएच 09-एजे 9970) अपहरण केले. तेथून त्याला भोसे (ता. मिरज) येथे नेले. याठिकाणी सूरजला नग्न केले. त्याचा मोबाईलवर व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ सूरजचा मित्र विनायक आंबी (रा. शंभरफुटी रस्ता, सांगली) याच्या मोबाईलवर टाकला.
संशयितांनी आंबीला मोबाईलवर संपर्क साधून, सूरजला व्हिडिओ कॉल करून त्याला नग्नावस्थेत बसविलेले दाखविले. 'तुझा मित्र जिवंत पाहिजे असेल तर तीन लाख रुपये आमच्या खात्यावर टाक, नाही तर त्याचे तुकडे करून त्याला मारून टाकेन', अशी धमकी दिली. आंबी याने तातडीने शहर पोलिसांना संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संशयितांचा मोबाईल लोकेशनवरून शोध सुरू ठेवला. संशयित सूरजला घेऊन सातत्याने ठिकाण बदलत होते. भोसे, अंकली व कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, दानोळी येथे ते थांबले होते. रविवारी पहाटे ते मिरजेहून सांगलीकडे येत असल्याचे लोकेशन मिळाले. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर त्यांना पकडण्यात यश आले. सूरजची सुखरूप सुटका केली. संशयितांना अटक करून त्यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.