विटा : वाढदिवसाच्या पार्टीत दारूच्या नशेत धाडस दाखवण्यासाठी टेंभू कालव्यात उडी मारणे एका तरुणाच्या जिवावर बेतले. 100 फूट खोल पाण्यात बुडून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. श्रीकांत विलास पवार (वय 30, रा. सुळेवाडी, ता. खानापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्री घडलेली ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
बुधवारी श्रीकांत पवार याचा वाढदिवस होता. या निमित्ताने त्याने सुळेवाडीजवळील टेंभू योजनेच्या खानापूर-तासगाव कालव्यावर मित्रांसोबत पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत मद्यप्राशन केल्यानंतर नशेत असतानाच श्रीकांतने मित्रांसोबत पाण्यात उतरण्याची पैज लावली. ‘मी माझे धाडस दाखवतो’, असे म्हणत त्याने पुलावरून थेट 100 फूट खोल असलेल्या आणि पाण्याने तुडुंब भरलेल्या कालव्यात उडी मारली.
मध्यरात्रीची वेळ, त्यातच नशेत असल्याने श्रीकांतला पाण्याचा आणि खोलीचा अंदाज आला नाही. नीट पोहता न आल्याने तो पाण्यात बुडाला. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही तो मिळून आला नाही. अखेर गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता त्याचा मृतदेह कालव्यातील पाण्यात तरंगताना आढळून आला. याबाबत शरद तुकाराम पवार यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीस पाठवला. वाढदिवशीच तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याने सुळेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.