सांगली : येथील बालाजीनगर परिसरातील पेट्रोल पंपासमोरील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून मंगळवारी रात्री एका २० वर्षीय तरुणाने उडी घेतली होती. हर्षद राजेश मोरे (वय २०, रा. बालाजीनगर, सांगली) असे या तरुणाचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या हर्षदचा बुधवारी शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याची माहिती संजयनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बालाजीनगर परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास हर्षद मोरे हा या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेला आणि तेथून खाली उडी घेतली. या घटनेत त्याच्या मणक्याला व कमरेला गंभीर इजा झाली. घटनेची माहिती मिळताच आयुष रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी व बेशुद्ध अवस्थेतील हर्षदला तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, संजयनगर पोलिस पुढील तपास करत आहेत.