कुपवाड : पुढारी वृत्तसेवा
जुन्या भांडणाच्या कारणावरून सार्थक सुनील सुतार (वय १९, रा. रामरहिम कॉलनी, संजयनगर, सांगली) या तरुणावर तलवार, चॉपर, चाकू, कोयत्याने सपासप वार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला.
जखमीवर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी सुतार याने संशयित सहा जणांविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरमान रफीक नगारजी (वय २४, रा. शामनगर, कुपवाड), तोहिद मौला मुल्ला (२०, रा. संजयनगर, सांगली), अनीस अमीर शेख (२०,रा. लव्हली सर्कल, संजयनगर, सांगली), रेहान ऊर्फ छोट्या (रा. नेहरूनगर, संजयनगर, सांगली), अमीर शेख (४५, रा. लव्हली सर्कल, संजयनगर, सांगली) व शुभम पारवे (३०, रा. सूतगिरणी रोड, कुपवाड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
फिर्यादी सार्थक सुतार हा मंगळवारी सायंकाळी कुपवाड शहरातील शामनगर येथे राहणाऱ्या मुबीन मुस्ताक भाटकर यांच्या घरी बसला होता. यावेळी संशयित आरमान नगारजी, तोहिद मुल्ला, अनीस शेख, रेहान ऊर्फ छोट्या चाकू, कोयता घेऊन भाटकर यांच्या घरात घुसले. मुबीन भाटकर याच्याबरोबर का फिरतोस, त्याच्याशी बोलतोस?,
असे म्हणत जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयितांनी सार्थक सुतार याच्यावर शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. सुतार याला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देऊन संशयित पसार झाले. जखमीला नातेवाईक व इतरांनी तातडीने सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. जखमीवर उपचार सुरू आहेत. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.