ईश्वरपूर : कोण... कधी... कोठे... कोणासाठी देवदूत ठरेल हे सांगता येत नाही. अशीच घटना 35 हजार फूट उंचीवर क्वालालंपूर ते बंगळुरू विमान प्रवासात घडली. विमानात एका 17 वर्षीय तरुणीची तब्येत अचानक बिघडली. अशावेळी कोणतीही अत्याधुनिक वैद्यकीय साधने नसताना, ईश्वरपूर येथील डॉ. अमित सूर्यवंशी (मूळ रा. नेर्ले) यांनी तिला कृत्रिम श्वास देत तिचे प्राण वाचवले. डॉ. सूर्यवंशी तिच्यासाठी देवदूत ठरले. ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय त्यावेळी आला.
डॉ. अमित सूर्यवंशी हे मलेशियाला गेले होते. बुधवारी क्वालालंपूर ते बंगळुरू या विमानाने ते परत येत होते. विमानात 180 प्रवासी होते. बंगळुरू येथील 17 वर्षांची एक तरुणी मलेशियातील योगा स्पर्धा खेळून तिच्या कुटुंबासह याच विमानातून परतत होती. विमानाने उड्डाण केले. विमान 35 हजार फूट उंचीवर असताना या तरुणीला फिट आली आणि ती खुर्चीवरून खाली पडली. तरुणीचे आई-वडील घाबरले. थोडा गोंधळ उडाला.
मुलीपासून पुढे तिसऱ्या रांगेत बसलेले डॉ. सूर्यवंशी यांना हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी तरुणीकडे धाव घेतली व तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले. डॉ. सूर्यवंशी यांनी वैद्यकीय अनुभव पणाला लावले. तरुणीच्या तोंडामध्ये धाडसाने दोन बोटे घालून, जीभ दाताखाली सापडण्यापासून रोखली. तेथे असलेल्या अंबू बॅगद्वारे तिला प्राणवायू दिला. तिच्या भोवतालचे वातावरण मोकळे ठेवण्यात आले. तिच्या नाडीचे ठोके, हृदयगती यावर सातत्याने लक्ष केंद्रित केले. तिला आवश्यक औषधे देऊन प्रवास संपेपर्यंत डॉ. सूर्यवंशी यांनी तिच्यावर लक्ष ठेवले. डॉ. सूर्यवंशी यांनी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या तरुणीचे प्राण वाचवले.
विमान कंपनीने दिले आभारपत्र...
याबद्दल सदर विमान कंपनीचे वैमानिक, सहवैमानिक, हवाईसुंदरी यांनी डॉ. सूर्यवंशी यांना आभारपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली. प्रवाशांनीही डॉ. सूर्यवंशी यांच्या या मदतीचे कौतुक केले.
आप्तकालीन परिस्थितीवेळी तेथे उपस्थित डॉक्टरांनी तत्परता दाखवून नागरिकांना वैद्यकीय मदत करायला हवी. तरुणीचे प्राण वाचल्याचे समाधान आहे.- डॉ. अमित सूर्यवंशी