तरुण, अल्पवयीन मुले नशेच्या आहारी जात आहेत.  Pudhari File Photo
सांगली

सांगली : 59 ‘डार्कस्पॉट’ वर रात्रं-दिवस नशेबाजीचा खेळ

पुढारी वृत्तसेवा
उध्दव पाटील

तरुण, अल्पवयीन मुले नशेच्या आहारी जात आहेत. अमली पदार्थांची विक्री आणि ‘डार्कस्पॉट’ यांना भेदण्याचे आव्हान महापालिका, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनापुढे आहे.

मुंबई, पुण्यापासून सांगली-मिरज दूर नाही. महापालिका क्षेत्रात नशेबाजीचे 59 डार्कस्पॉट आहेत. सांगलीत 32 आणि मिरज व कुपवाडमध्ये 27 डार्कस्पॉट. काही ठिकाणे नव्याने डार्कस्पॉट बनू लागली आहेत. त्यामुळे महापालिका, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन झोपेच्या सोंगेतून जागे होणार का ?

अमली पदार्थांची विक्री व वापर वाढल्याच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर मध्यंतरी महापालिकेत महापालिका प्रशासन, पोलिस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन यांची संयुक्त बैठक झाली. जिमचालक, पानपट्टीचालक, कुरिअर व्यावसायिक, केमिस्ट यांना बैठकीला बोलावले होते. नार्को को-ऑर्डिनेशन सेंटरच्या ‘एनकार्ड’ या उच्चस्तरीय समितीच्या अमली पदार्थविरोधी आणि नशेच्या गोळ्यांबाबत मार्गदर्शक सूचनाही स्पष्ट केल्या. व्यवसायाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नशेचे औषध किंवा इंजेक्शन कोणी घेणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे सांगितले होते. पण लक्षात कोण घेतो ?

पानपट्टी आवारात नशेबाज थांबणार नाहीत किंवा पान, मावा यावर नशेचे पाणी मारण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल. अवैधरित्या नशेच्या गोळ्या, इंजेक्शन किंवा औषधे उपलब्ध होणार नाहीत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गोळ्या, औषधे देऊ नयेत, अशा सूचना केमिस्टना दिल्या होत्या. पण केवळ सूचना देण्यापुरती जबाबदारी मर्यादित न ठेवता कृतीही करायला पाहिजे.

निवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक

डॉ. संजय साळुंखे म्हणाले, रुग्णाचा कमी झालेला रक्तदाब वाढवण्यासाठी मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन वापरले जाते. त्याचे साईड इफेक्टही आहेत. गुंगी येणे, अस्तित्वात नसलेले आवाज, अस्तित्वात नसलेल्या प्रतिमा दिसणे. मनपटलावर कल्पनाचित्र उभे राहणे हे साईड इफेक्ट आहेत, पण साईड इफेक्टचा वापर इफेक्ट म्हणूनही करणारे काहीजण असू शकतील.

स्टेडियमच्या टेरेसवर इंजेक्शन, सिरिंज

लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे म्हणाले, सांगलीत नुकतेच एका स्टेडियमच्या टेरेसवर दारू, बिअरच्या रिकाम्या बाटल्या, नशेच्या औषधांच्या बाटल्या आणि वापरलेल्या सिरिंजही दिसून आल्या. मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनची बाटलीही आढळली. त्यामुळे दिवसा, रात्री पोलिस गस्त वाढवणे आवश्यक आहे.

नशेबाजांचे अड्डे...

खुले भूखंड, क्रीडांगणे, कुस्ती आखाडे, नागरी वस्तीपासून थोड्या अंतरावर मोकळ्या जागेतील झाडा-झुडपांचा अडोसा, शामरावनगर परिसरातील झाडा-झुडपांचा काही भाग, स्टेडियमची गॅलरी व अडोशाचा भाग, कृष्णा नदीजवळील शेरीनाला परिसर, बायपास रस्ता, बंद असलेली काही घरे, इमारती इत्यादी... इत्यादी...

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT