सांगलीत भरधाव मोटारीच्या धडकेत डॉक्टर तरुणीचा मृत्यू 
सांगली

Sangli Accident : सांगलीत भरधाव मोटारीच्या धडकेत डॉक्टर तरुणीचा मृत्यू

विश्रामबाग चौक परिसरातील उड्डाण पुलावर मध्यरात्री अपघात

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : विश्रामबाग चौक ते लक्ष्मी मंदिर रस्त्यावरील रेल्वे पुलावर कुल्लोळी हॉस्पिटलसमोर भरधाव मोटारीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सांगली शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरचा मृत्यू झाला. डॉ. खुशी पवन मुंदडा (वय २४, मूळ रा. नागपूर) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. या अपघातात दुचाकी चालवणारे डॉ. योगेश संतोष लड्डा (वय २७, मूळ रा. वाशीम, सध्या रा. आयएचआर हॉस्टेल, सिव्हिल हॉस्पिटल, सांगली) हे किरकोळ जखमी झाले. गुरुवार, दि. ६ रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. योगेश लड्डा आणि डॉ. खुशी मुंदडा हे दोघेही सांगलीच्या शासकीय रुग्णालयात कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील काम संपवून दोघेही डॉ. खुशी यांच्या दुचाकीवरून नाश्ता करण्यासाठी निघाले होते. दुचाकी डॉ. योगेश लड्डा चालवत होते, तर डॉ. खुशी मागे बसल्या होत्या. रात्री २ वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग चौक ते लक्ष्मी मंदिर रस्त्यावरील रेल्वे पुलावर कुल्लोळी हॉस्पिटलसमोर ते आले असता, समोरून वेगात आलेल्या मोटारीने (क्र. एमएच १० एएम ७४८१) त्यांच्या दुचाकीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली.

अपघातात डॉ. योगेश रस्त्याच्या डाव्या बाजूला पडल्याने त्यांना मुका मार लागून दुखापत झाली, तर मागे बसलेल्या डॉ. खुशी यांच्या कमरेला व शरीरावर गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर थांबलेल्या मोटारीमधील २५ ते ३० वयोगटातील तीन तरुणांनी गंभीर जखमी डॉ. खुशी यांना उपचारासाठी स्वतःच्या मोटारीतून खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्त्राव आणि गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान डॉ. खुशी मुंदडा यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. योगेश लड्डा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

मिरज महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण

डॉ. खुशी मुंदडा यांनी एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्या शासकीय रुग्णालयामध्ये सेवा देत होत्या. त्यांच्या अपघाती निधनाने वैद्यकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT