देवराष्ट्रे :आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी ज्या शाळेत शिक्षणाचा श्री गणेशा सुरू केला, त्या शाळेची अवस्था दयनीय झाली आहे. परिसरात अस्वच्छता असून खिडक्यांच्या काचाही अज्ञातांनी फोडल्या आहेत. काही महिन्यांपासून शाळा खोल्यांचे कुलूप काढले नसल्याने धुळीचा थर साचला आहे. शाळेची अशी अवस्था झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
यशवंतराव चव्हाण यांचे बालपण देवराष्ट्रे येथे गेले. त्यांनी देवराष्ट्रे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत काही वर्षे शिक्षण घेतले. तसा उल्लेखही यशवंतरावांनी आत्मचरित्रात केला आहे. यशवंतराव ज्या शाळेत शिकले, ती शाळा शासनाने जतन करण्याचा निर्णय घेतला होता. सन 2014 मध्ये त्याच्या दुरूस्तीवर मोठा निधी खर्च केला होता. शाळेच्या डागडुजीबरोबर संरक्षक भिंत, भोवताली काँक्रीटीकरण, वृक्षारोपण अशी कामे करण्यात आली होती. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्या वैशाली कदम यांनी जिल्हा परिषदेच्या निधीतून दुरूस्ती केली होती. त्यामुळे शाळा सुंदर झाली होती. मध्यंतरी या शाळेत ग्रंथालय, वाचनालय शिवाय इंग्लिश लॅब तयार करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात होते. बराच निधी खर्च केला आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून या शाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
वरिष्ठ मुख्याध्यापक उज्ज्वला चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, येथील एक खोली महिला बचत गटासाठी देण्यात आली आहे. याबाबत मला काही माहिती नसून 6 महिन्यांपूर्वी मी या शाळेत हजर झाले आहे. तरीही अद्याप माझ्याकडे पदभार देण्यात आलेला नाही. त्यामुळे मला अधिक माहिती नाही.