World Bicycle Day | सांगली कधी येणार ‘सायकल ट्रॅक’वर? Pudhari File Photo
सांगली

World Bicycle Day | सांगली कधी येणार ‘सायकल ट्रॅक’वर?

सांगली रँडोनिअर, सायकल स्नेही, अ‍ॅक्टिव्ह ग्रुप रुजवताहेत सायकलिंग जीवनशैली

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सायकलिंग हा केवळ व्यायाम नाही, तर ती एक जीवनशैली आहे. देश, परदेशात काही शहरांमध्ये स्वतंत्र सायकल ट्रॅक आहेत. त्यातून सायकलिंगला प्रोत्साहन मिळते. त्या धर्तीवर सांगलीतही सायकल ट्रॅक विकसित होणे गरजेचे आहे.

महानगरपालिका क्षेत्राची विकास योजना (डीपी) तयार केली जाते. त्यात आता रस्त्यांबरोबरच सायकल ट्रॅकचाही विचार होणे गरजेचे आहे. शहरात सांगली रँडोनिअर, सांगली सायकल स्नेही, सांगली अ‍ॅक्टीव्ह ग्रुप यासारखे हौशी सायकलपटुंचे ग्रुप सायकलिंग जीवनशैली रुजवत आहेत.

सांगली रँडोनिअर क्लबचे संस्थापक सदस्य डॉ. केतन गद्रे म्हणाले, सांगली रँडोनिअर क्लबतर्फे 100 ते 1200 किलोमीटर पल्ल्याचे सायकल उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. अनेक सायकलप्रेमी सहभागी होतात. सांगली सायकल स्नेही आणि सांगली अ‍ॅॅक्टिव्ह सायकलिंग, या क्लबमार्फत सांगली जवळील ऐतिहासिक स्थळांना सायकलवरून भेट दिली जाते. पर्यावरणासंबंधी जागृती केली जाते.

सायकलिंगमुळे शरीर तर तंदुरुस्त राहतेच, पण मनदेखील टवटवीत राहते. लहान मुलांना उंची योग्य रीतीने वाढण्यासाठी, स्थूलता टाळण्यासाठी अतिशय उत्तम व्यायाम प्रकार म्हणजे सायकलिंग. आयुष्यातील ताणतणाव व्यवस्थित हाताळण्यासाठी सायकलिंग नियमितपणे करून मन उत्साही ठेवता येते.

सायकलिंग करताना एक पथ्य पाळणे महत्त्वाचे आहे, ते म्हणजे स्वतःच्या सुरक्षतेची पूर्ण काळजी घेणे, जसे की हेल्मेट आणि लाईटचा वापर. सायकलिंगची सुरुवात कुठल्याही वयात करता येते, कुठल्याही प्रकारच्या सायकलवर सुरुवात केली जाऊ शकते, यात प्रावीण्य मिळवण्यासाठी कोणत्याही वयाचे बंधन नाही. माझ्या अनुभवावरून एक नक्की सांगू शकतो की सायकलिंगची आवड निर्माण झाली की, ती आपोआप जीवनशैली होऊन जाते, असे डॉ. गद्रे यांनी सांगितले.

सांगलीत सायकलिंगसाठी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे स्वतंत्र सायकल ट्रॅकची कमतरता. मी काही दिवसापूर्वी नॉर्वे या देशाला भेट दिली. तिथे वेगळे सायकल ट्रॅक आहेत. तिथे आपल्याकडे असतात तशी चिकन 65 या गाड्यांची आणि गॅरेजवाल्यांची अतिक्रमणे नाहीत. त्यामुळे लोक निर्धास्तपणे सायकल चालवतात. मोटारीदेखील या ट्रॅकवर येत नाहीत. रस्त्यांची स्थिती तर उत्तमच असते. सांगलीमध्ये प्रशासनाने या बाबतीत लक्ष घालावे, ही आम्हा सर्व सायकलप्रेमींची विनंती आहे.
- डॉ. केतन गद्रे, संस्थापक सदस्य, सांगली रँडोनिअर क्लब.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT