पलूस : रामानंदनगर येथील कारखान्यात लेथ मशीनवर काम करत असताना गळ्यातील मफलर मशीनच्या शाफ्टमध्ये अडकून ओढला गेल्याने कामगाराचा मृत्यू झाला. पंकज वसंत पाटील-नागावकर (वय 48, रा. बुर्ली, ता. पलूस) असे मृताचे नाव आहे. ही घटना शुक्रवार, दि. 19 रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली.
पंकज पाटील हे बुर्लीचे माजी ग्रामपंचायत सदस्य होते. रामानंदनगर येथील ‘अरिहंत इंजिनियरिंग वर्क्स’ या कारखान्यात ते गेली 10 ते 12 वर्षे लेथ मशीन ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ते घरातून जेवणाचा डबा घेऊन कामावर आले. कारखान्यात ते एकटेच काम करत होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी कानाला मफलर बांधला होता. काम करत असताना अचानक मफलर लेथ मशीनच्या फिरत्या शाफ्टमध्ये अडकला. मफलर वेगाने गुंडाळला गेल्याने पंकज पाटील यांचे डोके मशीनवर जोरात आपटले. डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कारखाना मालकांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसपाटील इम्तियाज शिराज मुल्ला (रामानंदनगर) यांनी पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पलूस पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूबाबत नोंद करण्यात आली आहे. 2016 मध्ये पंकज पाटील यांनी बुर्लीचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.