सांगली : महापालिका निवडणूक समोर असताना भाजपअंतर्गत कलह, गटबाजी वाढली आहे. पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांचे समर्थक माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या उमेदवारीवरून वादंग उठले. काही ठिकाणी गैरसमजुतीने नेत्यांमध्ये मतभेद वाढले. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी भाजप शहर जिल्हा कोअर कमिटीची बैठक घेऊन गटबाजी, वादंगावर तोडगा काढला. महापालिका निवडणुकीत उमेदवार ठरवणे व प्रचारात समन्वय ठेवण्यासाठी पाचजणांची समिती नियुक्त करण्यात आली. महापालिका निवडणुकीला एकसंधपणे सामोरे जाण्याचा निर्णय कोअर कमिटी बैठकीत घेण्यात आला.
मिरज येथील शासकीय विश्रामधाममध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, महापालिका क्षेत्र निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पश्चिम महाराष्ट्र संघटन प्रमुख मकरंद देशपांडे, पृथ्वीराज पाटील, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजप नेत्या जयश्री पाटील, नीता केळकर, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे, माजी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, सुरेश आवटी, धीरज सूर्यवंशी, पांडुरंग कोरे यांच्यासह कोअर कमिटीतील सदस्य उपस्थित होते.
दोन स्वतंत्र बैठका
महापालिका क्षेत्रात आमदार सुधीर गाडगीळ आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. सांगलीत भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांच्या उमेदवारीवरून थेट सवाल करीत उघडपणे नाराजी व्यक्त झाली होती. याचदरम्यान, मिरजेचे आमदार सुरेश खाडेही नाराज असल्याची चर्चा सुरू होती. या सर्व पार्श्वभूमीवर तसेच लवकरच महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी शहर जिल्हा कोअर कमिटीची बैठक घेतली. त्यांनी प्रथम आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, प्रकाश ढंग, दिनकर पाटील, नीता केळकर, दीपक शिंदे यांची बैठक घेतली. त्यानंतर या नेत्यांसह कोअर कमिटीची बैठक घेतली.
पक्षशिस्त मोडल्यास कारवाई : पालकमंत्री
पक्षातील काही लोक स्वतंत्र आघाडीची नोंदणी करून महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी करीत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वांना पक्षाची शिस्त पाळावी लागेल, शिस्तीच्या बाहेर गेले तर कारवाईला सामोरे जावे लागेल. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची राजकीय समीकरणे वेगळी होती, त्याचा महापालिका निवडणुकीवर कोणत्याही परिस्थितीत परिणाम होणार नाही. महायुती म्हणून महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाईल. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, जनुसराज्य, आरपीआय यांची महायुती होईल. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकवला जाईल. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
वीस प्रभागांचा घेतला आढावा
या बैठकीवेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका क्षेत्रातील सर्व 20 प्रभागांचा आढावा घेतला. राजकीय स्थितीची माहिती घेतली. आगामी महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी कोअर कमिटीतील सर्व नेत्यांना सूचना केल्या. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्रातील सर्व भाजप इच्छुक उमेदवारांनी घरोघरी जाऊन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने केलेली केंद्रातील कामे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात झालेली कामे यासंबंधीची माहिती पोहोचवावी.
भाजपचा जाहीरनामा लवकरच : चंद्रकांत पाटील
महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा काय असावा, हे जनतेशी संवाद साधून आणि त्यांचे प्रश्न आणि सूचना लक्षात घेऊन तयार करणार आहोत. जाहीरनामा लवकरच तयार होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी शहर जिल्हा कोअर कमिटीतील नेत्यांनीही प्रभागातील माहिती, समस्या, प्रश्न याबाबतची माहिती दिली.