मिरज : येथील मिरज शासकीय रुग्णालयासमोर भरधाव डंपरखाली चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा दीर गंभीर जखमी झाला. नंदिनी मच्छिंद्र दोलतडे (वय 32) असे मृत महिलेचे नाव आहे, तर त्यांचे दीर मनोज कृष्णदेव दोलतडे (रा. संजयनगर, सांगली) हे गंभीर जखमी झाले. कुटुंबातील सदस्यासाठी सांगोला येथे स्थळ पाहण्यासाठी जात असताना दोलतडे कुटुंबावर काळाने घाला घातला. याप्रकरणी सूरज चंद्रकांत पाटील (26, रा. कुपवाड) या चालकाविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदिनी आणि मनोज हे भावजय-दीर कुटुंबातील सदस्यासाठी स्थळ पाहण्यास सोलापूर जिल्ह्यातील सांगोलाकडे दुचाकीवरून निघाले होते. शनिवार दि. 6 रोजी दुपारी ते मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर आले असता, भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांना डाव्या बाजूने धडक दिली. त्यामुळे नंदिनी या डंपरच्या मागील चाकाखाली सापडल्या, तर मनोज हे दूरवर फेकले गेले. यावेळी नंदिनी यांच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मनोज गंभीर जखमी झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण चौगले, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अण्णासाहेब गादेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे डंपरचालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू आहे.