सांगली ः शहरातील हरभट रस्त्यावरील टिळक चौकात भाजी खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. ही घटना शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. चोरीनंतर चोरटे दुचाकीवरून सांगलीवाडीच्या दिशेने पसार झाले. याबाबत धनश्री विठ्ठल काळे (वय 44, रा. फौजदार गल्ली, खणभाग, सांगली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हरभट रोड, कापडपेठ परिसरात काल आठवडा बाजार होता. त्यातच संततधार पाऊसही पडत होता. फिर्यादी काळे या सायंकाळी भाजी खरेदीसाठी बाजारात आल्या होत्या. हरभट रस्त्यावरील टिळक चौकात पाऊस आल्याने त्या रस्त्याकडेला एका दुकानासमोर थांबल्या होत्या. त्यावेळी तोंडाला कापड बांधलेला चोरटा त्यांच्याशेजारी येऊन उभा राहिला, तर त्याचा साथीदार दुचाकी घेऊन रस्त्यावर थांबला होता. दुकान बंद होताच त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्याला हिसडा मारून दुचाकीवरून पळ काढला. काळे यांनी आरडाओरडा केला, पण चोरटे सांगलीवाडीच्या दिशेने भरधाव निघून गेले.
या घटनेची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरीची माहिती घेतली. टिळक चौक व सांगलीवाडी परिसरातील सीसीटीव्ही तपासणीचे काम सुरू केले. भर बाजारात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.