विवाहितेचा छळ File Photo
सांगली

Sangli News : माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीचा छळ

सोलापूरच्या पतीविरोधात तासगाव पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : लग्नानंतर माहेरून पैसे आणण्यासाठी, तसेच सासऱ्याची मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी रामचंद्र खंडागळे (रा. जुना देगाव नाका, लक्ष्मी पेठ, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी स्वप्नजा शिवाजी कांबळे (वय २१, सध्या रा. कवठे एकंद, ता. तासगाव, मूळ रा. सोलापूर) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तासगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नजा यांचा विवाह २०२४ मध्ये सोलापूर येथील शिवाजी खंडागळे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर वर्षभराने त्यांना एक मूल झाले. मार्च २०२५ पासून संशयित शिवाजी याने माहेरून पैसे आणण्याच्या मागणीवरून स्वप्नजा यांना त्रास देण्यास सुरुवात केली. काही दिवसांनंतर दारूचे व्यसन करून त्याने पत्नीचे मंगळसूत्र व कर्णफुले विकून टाकली आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून स्वप्नजा माहेरी निघून आल्या होत्या.

त्यानंतर शिवाजी हा पत्नीला नेण्यासाठी कवठे एकंद येथे आला आणि ते दोघे सांगली येथे वास्तव्यास आले. मात्र, सांगलीतही त्याने शिवीगाळ व मारहाण सुरूच ठेवली. ‘तुझ्या वडिलांची संपत्ती माझ्या नावावर कर’, असा तगादा लावून तो छळ करत होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये संशयिताने पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय घेऊन मारहाण करत त्यांना घराबाहेर काढले.

या प्रकारानंतर स्वप्नजा या कवठे एकंद येथे आपल्या वडिलांकडे वास्तव्यास आल्या. पतीकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून त्यांनी अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी शिवाजी खंडागळे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, हवालदार एम. जी. हजारे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT