सांगली : जिल्ह्यातील काही महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वरिष्ठांकडून छळ होत असून, याची उच्चस्तरीय महिला समितीतर्फे चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर्स संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याबद्दल महिला डॉक्टरांनी आमच्याकडे तक्रार दाखल केली आहे. महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सन्मान, मानसिक सुरक्षितता व कार्यस्थळी सुरक्षित वातावरणाशी थेट निगडित आहे. म्हणून या प्रकरणाची उच्चस्तरीय महिला समितीतर्फे चौकशी करण्याची गरज आहे.
याबाबत महिला वैद्यकीय अधिकारी यांनी तक्रार केली आहे. त्यासंदर्भातील कागदपत्रेही उपलब्ध आहेत. या प्रकरणाची चौकशी जर स्थानिक अथवा कनिष्ठ स्तरावर झाली, तर ती निष्पक्ष व विश्वासार्ह राहण्याबाबत शंका निर्माण होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी पूर्णपणे पारदर्शक, स्वतंत्र व निष्पक्ष पद्धतीने उच्चस्तरीय महिला समितीमार्फतच करण्याची गरज आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा, मानसिक सुरक्षितता आणि सेवासंबंधी हितसंबंध अबाधित राहतील, याबाबत प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या कार्यस्थळी सुरक्षितता व न्याय मिळणे हा प्रशासनाचा नैतिक तसेच संविधानिक दायित्वाचा भाग असल्याने, या प्रकरणात न्याय मिळावा.
निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. विवेक पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील, राज्य सहसचिव डॉ. नितीन चिवटे, राज्य सहसचिव डॉ. अभिजित सांगलीकर आदींच्या सह्या आहेत.