कुंडल : येथील पदवीधर निर्धार मेळाव्यात पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार अरुण लाड, भाजपाचे प्रदेश सचिव शरद लाड, शेखर इनामदार, संग्रामसिंह देशमुख, राजाराम गरुड, प्रदीप कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  
सांगली

Dr. Smita Jadhav| पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावणार

पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांचा विश्वास

पुढारी वृत्तसेवा

कुंडल : महायुतीतील तिन्ही पक्षांनी उमेदवारी देऊन मला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आशीर्वाद दिला आहे. भारतीय जनता पक्षाने माझ्या हातात कमळ दिले आहे, यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणता असू शकत नाही. शरद लाड यांच्या मोलाच्या पाठबळावरच मी ही निवडणूक लढवत आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांनी केले.

कुंडल (ता. पलूस) येथे आयोजित पुणे पदवीधर निर्धार मेळाव्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार अरुण लाड, भाजप प्रदेश सचिव शरद लाड, शेखर इनामदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, प्रदीप कदम, क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्री लाड, शिवाजीराव मगर-पाटील, सरपंच जयराज होवाळ, मिलिंद पाटील, विलास काळेबाग आदी उपस्थित होते.

डॉ. स्मिताताई जाधव म्हणाल्या, गेल्या २५ वर्षांपासून मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात प्र-कुलगुरू म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्राचा विस्तार केला असून लाखो विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले आहे. या अनुभवाच्या आधारे नवरात्रीनिमित्त मी पदवीधरांना ९ वचने देत आहे. यामध्ये कौशल्य विकास, उद्योजक व संगणक प्रशिक्षण, करिअर कौन्सिलिंग केंद्र, वसतिगृहांची सोय आणि नोकरदार महिलांना सहकार्य या बाबींना प्राधान्य दिले जाईल.

डॉ. जी. डी. (बापू) लाड यांचे विचार आमदार अरुण लाड यांनी पुढे नेले. त्याचबरोबर शरद लाड यांनी समाजसेवा, राजकीय व शैक्षणिक या तिन्ही विभागात उत्तम काम केले आहे. आज त्यांनी आपल्या मुलीला, बहिणीला आशीर्वाद दिला आहे, याची मला जाणीव आहे. तुमची मुलगी म्हणून मी पुणे पदवीधर मतदार संघात चांगले काम करून दाखवीन.

भाजप प्रदेश सचिव शरद लाड म्हणाले, क्रांती समूहाची पुणे पदवीधर मतदारसंघातील ही चौथी निवडणूक आहे. पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यांत उच्चांकी मतदार नोंदणी झाली आहे. डॉ. स्मिताताई जाधव यांच्यारूपाने उच्चशिक्षित आणि अनुभवी उमेदवार पक्षाने दिला आहे. सर्व कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून मतदारांपर्यंत पोहोचावे आणि स्मिताताईंना पहिल्या पसंतीच्या मताधिक्याने विजयी करावे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शेखर इनामदार म्हणाले, भाजप नेहमी चांगल्या नेतृत्वाच्या शोधात असतो आणि स्मिताताईंच्या रूपाने पक्षाला सक्षम नेतृत्व मिळाले आहे. गेल्या १२ वर्षांत जिल्ह्यात झालेली विकासकामे आणि शैक्षणिक अनुभवाच्या जोरावर कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेऊन मोठा विजय मिळवून द्यावा.

प्रदीप कदम म्हणाले, डॉ. स्मिताताई जाधव यांच्या विजयासाठी सर्वजण एकत्र काम करू. डॉ. स्मिताताईंना दोन्ही तालुक्यातून उच्चांकी मतदान घडवून आणू. स्मिताताईंनी निवडून आल्यानंतर आपले ‘माहेर’ म्हणून पलूस तालुक्याला झुकते माप द्यावे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड म्हणाले, पुणे पदवीधरमधून डॉ. स्मिताताई जाधव यांचा विजय निश्चित आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन चव्हाण यांनी केले. मेळाव्यास पलूस व कडेगाव तालुक्यातील भाजप व महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT