चंद्रकांत पाटील File Photo
सांगली

विशाल यांनी भाजप प्रवेश न केल्यास उमेदवार तयार करू : चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले, तर ते काहीही करतात

पुढारी वृत्तसेवा

सांगली : खासदार विशाल पाटील हे तरुण, अभ्यासू, हुशार राजकारणी आहेत. त्यांना भाजपमध्ये मोठी संधी आहे. त्यांना भाजप प्रवेशाची ऑफर आजही कायम आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश न केल्यास लोकसभेच्या 2029 च्या निवडणुकीसाठी उमेदवार तयार करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले, तर ते काहीही करतात, असा सूचक इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी जिल्हा बँक उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, आज सकाळीच एका कार्यक्रमात माझी व खासदार विशाल पाटील यांची भेट झाली. ‘कोठे चालला आहात?’, असे विशाल पाटील यांनी मला विचारले. ‘तुमच्याच घरी...’, असे त्यांना म्हणालो. त्यावर ‘बरं बरं जावा जावा’, असे विशाल पाटील म्हणाले. ‘प्रत्यक्षात तुझ्या घरी कधी यायचे?, असे विचारल्यावर विशाल नुसता हसला’, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर यापूर्वीही दिलेली आहे, आजही देत आहे. चांगल्या माणसाने राजकारणात लवचिक असावे लागते. अन्यथा त्यांच्या राजकारणाला मर्यादा येतात. विशाल पाटील तरुण खासदार आहेत. अभ्यासू आहेत. त्यांनी भाजपमध्ये यावे, त्यांना मोठी संधी आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. विशाल पाटील यांचा उतावीळपणा, आततायीपणा मला आवडत नाही. राजकारणाची खोली वाढवली पाहिजे, त्यांनाही माहिती आहे. ते माहिती असणे हा त्यांचा चांगला गुण आहे. त्यांच्या तसेच त्यांचे बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या पक्षप्रवेशाची आम्ही वाट पाहत आहोत. विशाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश न केल्यास आम्ही लोकसभेच्या 2029 च्या निवडणुकीसाठी उमेदवार तयार करू, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT