सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. या मतदारसंघातील विद्यमान आमदार अरुण लाड यांचे पुत्र व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष शरद लाड हे या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यादृष्टीने त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केलेली आहे. त्यांनी मंगळवारी मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी जनसुराज्य पक्षाचे समित कदम हेही उपस्थित होते.
पदवीधरांमधून विधानपरिषदेमध्ये एक आमदार प्रत्येक सहा वर्षातून पाठवण्यात येतो. पुणे पदवीधर मतदारसंघ हा पूर्वी भाजपचा म्हणून ओळखला जात होता. या मतदारसंघातून पूर्वी प्रकाश जावडेकर निवडून जात होते. सन 2014 च्या निवडणुकीत विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पदवीधर मतदारसंघातून निवडून गेले. त्यावेळी विद्यमान आमदार अरुण लाड यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र राष्ट्रवादीने माजी खासदार श्रीरंग पाटील यांचे पुत्र सारंग पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अरुण लाड अपक्ष उभे होते. यावेळी चंद्रकांत पाटील विजयी झाले. गेल्या निवडणुकीत अरुण लाड विरुद्ध भाजपचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्यात लढत झाली. अरुण लाड विजयी झाले. आता पुढीलवर्षी पदवीधरची निवडणूक होणार आहे. त्यासाठी शरद लाड यांनी आतापासूनच तयारी सुरू केलेली आहे.
मी पदवीधर निवडणुकीसाठी तयारी सुरू केलेली आहे. विविध कामांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी मी घेत असतो. त्याप्रमाणे चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. अजून कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची, हे निश्चित झालेले नाही.- शरद लाड युवक नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष