शिराळा शहर : शिराळा तालुका हा पावसाचे आगर म्हणून ओळखला जातो. अधिक तर भाग जंगलव्याप्त आहे. त्यामुळे या ठिकाणी असंख्य प्रकारच्या औषधी वनस्पती, फुले, वेली व फळे मुबलक आढळतात. मात्र सध्या शेतीसाठी तणनाशक फवारणी केली जात आहे, त्यामुळे नैसर्गिक स्रोतांतून शेतात किंवा बांधावर व त्याबाजूला उगवणारी रानभाजी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
शिराळा तालुक्यात अधिक तर ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग तसेच शाळू, मका ही पिके घेतली जातात. या पिकांभोवती किंवा बांधावर या रानभाज्या येत असत. ही शेती शेणखत वापरून सेंद्रिय पद्धतीने केली जात असे. त्यामुळे पिकांबरोबर काही तण उगवत असे. हे तण म्हणजे अनेकदा रानभाज्या असत. यात कुंजीर, तांदुळजा, पोकळा, चिल किंवा चंदन बटवा, माठ अशा भाज्या हमखास असत. निंदणी करताना या रानभाज्या खुडून घेतल्या जात असत, म्हणजे पुढच्यावेळी पुन्हा याला पाने येत आणि भाजी उपलब्ध होई. मिश्रशेतीत राजगिरा, हिरवी अंबाडी, लाल अंबाडी, खुरासणी, करडई या भाज्या मुद्दाम लावल्या जात असत. खुरासणी, करडई यांच्या पानांबरोबरच तेलबियादेखील असतात, जेणेकरून कुटुंबासाठी घरचेच तेल उपलब्ध होत असे. बांधाच्या कडेला भोपळावर्गीय, वालवर्गीय वेल लावले जात, याच्याही पानांची भाजी होत असे. आता ज्वारी-बाजरीची जागा सोयाबीन-कपाशीने घेतली आहे. शेणखताऐवजी रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. तणनाशकाच्या वापराने शेतात कोणतेच तण येऊ दिले जात नाही. त्याचा परिणाम होऊन रानभाज्यादेखील कमी झाल्या.
पावसाळ्यात शेतात उगवणार्या अंबाडी, करटुले, अळूची पाने, तरोटा, माठ आदी रानभाज्या पावसाळ्यातील जेवणाची लज्जत वाढवतात. त्यामुळे कोणतीही फवारणी करताना ठराविक मात्रा देणे गरजेचे आहे. रानभाज्या हा आपल्या आरोग्याचा खजाना आहे, तो जतन केलाच पाहिजे. -किरण पवार, तालुका कृषी अधिकारी, शिराळा