सांगली : पतीकडून सतत दारूच्या नशेत होणारी मारहाण आणि शिवीगाळीला कंटाळून, पत्नीने आपल्या २३ वर्षीय प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आनंद हणमंत सर्जे (वय २८, रा. पोळ मळा, १०० फुटी रोड, सांगली) असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नी आणि तिच्या प्रियकराला तातडीने ताब्यात घेतले असून, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आनंद सर्जे यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. गुरुवारी पहाटे त्यांच्यात पुन्हा किरकोळ कारणावरून भांडण झाले. पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने अखेर टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवून प्रियकराला घरी बोलावून घेतले. प्रियकर घरी आल्यानंतर दोघांनी मिळून आनंद सर्जे यांना गाठले. सुरुवातीला एका ओढणीच्या साहाय्याने हणमंत यांचे पाय घट्ट बांधले. त्यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने आनंद यांच्या छातीवर बसून त्यांचा गळा आवळून जीव घेतला. त्यानंतर त्यांचा झोपेतच मृत्यू झाल्याचा कांगावा करीत, हा मृत्यू नैसर्गिक दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांना पहाटेच रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी आनंद यांच्या गळ्यावर ओरखडे आढळून आले. उत्तरीय तपासणीत त्यांचा घातपात झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता ती गडबडली. तिच्या चेहऱ्यावरील भीती आणि बदललेली वर्तणूक पाहून पोलिसांना संशय आला. तिची कसून चौकशी असता तिने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची कबुली दिली.