सांगली : वानलेसवाडी येथे शनिवार, दि. 7 रोजी अविनाश प्रकाश आवळे (वय 34, रा. शिरगाव-विसापूर, ता. तासगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अविनाश यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी सुचित्रा आमोस भोरे (वय 29, रा. वानलेसवाडी), तिचा प्रियकर शेखर आवळे या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अविनाश यांचा भाऊ अमर प्रकाश आवळे (वय 36, रा. शिरगाव) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा भाऊ अविनाश आणि वानलेसवाडी येथील सुचित्रा आमोस भोरे यांचा विवाह झाला होता. सुचित्रा हिचे शेखर आवळे याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. दोघेही अविनाश याला त्रास देत होते. वेळावेळी त्यांना धमकी देऊन शिवीगाळ करत होते. यामुळे अविनाश यांचे जगणे अवघड झाले होते.
पत्नी व तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून दि. 7 रोजी सांगलीत आल्यानंतर अविनाश यांनी वानलेस चेस्ट हॉस्पिटलजवळील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रात्री 8 ते 8.30 या दरम्यान हा प्रकार घडला. विश्रामबाग पोलिस ठाण्यात याबाबत प्राथमिक नोंद आहे. दरम्यान, मृत अविनाश यांचा भाऊ अमर याने सुचित्रा व शेखर आवळे या दोघांच्या त्रासाला कंटाळून अविनाशने आत्महत्या केल्याची फिर्याद बुधवारी सायंकाळी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.