सांगली : शक्तिपीठ महामार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एवढा अट्टाहास का? अशी विचारणा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीचे उमेश देशमुख, सतीश साखळकर, महेश खराडे यांनी मंगळवारी येथे निवेदनाद्वारे केली.
शक्तिपीठ महामार्गासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील आरेखन बदलण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले. शक्तिपीठला समांतर महामार्ग आहे म्हणून आम्ही आरेखन बदलत आहोत, असे सांगत त्यांनी शक्तिपीठ होणारच, असे सूचित केले आहे. त्यांचा या महामार्गासाठी एवढा अट्टाहास का? अशी विचारणा या तिघांनी केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, हा समांतर महामार्ग एक, दोन जिल्ह्यांतून नाही, तर सर्वच जिल्ह्यांतून समांतर आहे. आरेखनानुसार ज्या वाळवा तालुक्याचे नाव घेतले, तेथील जमिनी देखील बागायती आहेत. बारमाही पीक देणाऱ्या या जमिनी देण्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी नक्कीच विरोध करतील.
मुख्यमंत्र्यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या घरावरील नांगर काढून त्या शेतकऱ्यांच्या घरावर ठेवला आहे. तो कोणाच्या घरावर फिरवणार हे अजून जाहीर केले नाही. आमचा लढा मात्र शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत चालूच राहील, असे निवेदनात म्हटले आहे.
जयंत पाटील यांची भूमिका काय राहील?
सांगली ते पेठनाका हा महामार्ग 166 मध्ये मर्ज करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी रत्नागिरी-नागपूर या महामार्गाएवढाच होता. त्या भागाचे लोकप्रतिनिधी आ. जयंत पाटील यांच्या आग्रहास्तव शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊ नयेत म्हणून या महामार्गाची रुंदी वाढवू दिली नाही. मग पूर्ण शेतीमधून जाणाऱ्या या महामार्गासाठी जमिनी देण्याबाबत त्यांची काय भूमिका राहील?