किल्लेमच्छिंद्रगड परिसरातील गुन्हेगारी रोखणार कोण? 
सांगली

Sangli Crime|किल्लेमच्छिंद्रगड परिसरातील गुन्हेगारी रोखणार कोण?

सामाजिक स्वास्थ्याला धोका ः गुंडांची पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत मजल

पुढारी वृत्तसेवा
संदीप माने

इस्लामपूर : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) परिसर सराईत गुंडांच्या कारनाम्यांमुळे बदनाम झालेला आहे. वाढती व्यसनाधीनता, बेरोजगारी, चैनीखोर जीवनशैली, शैक्षणिक गळती आदींमुळे या परिसरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. दोन दिवसापूर्वी गावगुंडांनी पोलिसांवर हल्ला करून बिहारची झलक दाखवली. कचखाऊ पोलिसिंग, लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेविषयी संताप व्यक्त होत आहे. किल्लेमच्छिंद्रगड सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक. काही वर्षापासून या परिसरात गुन्हेगारी वाढू लागली आहे. लवंडमाची, बेरडमाची, गोपाळवस्ती हा किल्लेमच्छिंद्रगडलगतचा भाग. हा भाग सातारा- सांगली जिल्ह्याची सीमा असल्याने हा भाग सर्वचदृष्टीने दुर्लक्षित आहे.

गांजाची झिंग... दारूची लत्...

किल्लेमच्छिंद्रगड, लवंडमाची, बेरडमाची, गोपाळवस्ती आदी परिसरात सराईत आठ ते नऊ गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर जबरी चोरी, मारहाण, खुनीहल्ला, खून आदी गंभीर गुन्हे इस्लामपूर, कराड पोलिस ठाण्यात दाखल आहेत. गुन्हेगारी कारनाम्यामुळे परिसरात त्यांची दहशत आहे. त्यातील काहीजण गांजाच्या आहारी गेले आहेत. गांजाच्या नशेतच त्यांचा गुन्ह्याचा आलेख चढता आहे. तेथील काही पान टपर्‍यावरही गांजा विक्री होत असल्याची ओरड कायम सुरू असते. गुन्हेगारीचे मूळ गांजा, तो कसा बंद होणार? हाच खरा कळीचा मुद्दा आहे. गोपाळवस्ती परिसरात हातावर पोट असणार्‍या कुटुंबांचे प्रमाण जास्त आहे. त्यांच्यात शैक्षणिक जागरूकता कमी आहे. तेथे मजुरांचे प्रमाण जास्त आहे. दररोज येणारा ताजा पैसा, आर्थिक नियोजन, शिक्षणाचा अभाव यामुळे तेथे दारू, गांजा आदी व्यसनांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे इस्लामपूर पोलिस ठाण्यात वारंवार तेथील मारहाणीची प्रकरणे दाखल होत असतात.

खिंडीत वाटमारी

काही वर्षांपूर्वी बेरडमाची परिसरात दारूच्या हातभट्या होत्या. त्यातून हातभट्या मालकांनी लाखो रुपयांची माया जमवली. कारवाईच्या भीतीने आता हातभट्या बंद झाल्या. त्यातून मिळणारा पैसा बंद झाला. पैशासाठी किल्लेमच्छिंद्रगडच्या खिंडीत वाटमारीचे प्रकार वाढले होते. दुचाकी, कार, ट्रॅक्टर चालकांना अडवून लुटण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. आता, हे प्रकार कमी झाले असले तरी अधुनमधून वाटमारीचे प्रकार घडतात.

पोलिसांचे ‘लक्ष्मीदर्शन’

बैलगाडी शर्यती असो वा एखादा सार्वजनिक कार्यक्रम, काही पोलिसांचे ‘लक्ष्मीदर्शन’ ठरलेले असते. काही गुन्हेगार वृत्तीच्या लोकांबरोबर जेवणाच्या पंगती झडतात, तर काही - काहींचे टेबल पार्टनर... मग हप्तेखोर पोलिसांचा धाक कसा राहणार?

पिस्तूल असती तर...

शनिवारी सायंकाळी चौकशीसाठी गेलेल्या पोलिस पथकावर गुंडांनी हल्ला केला. या प्रकरणातील संशयितांनी पोलिसांना गोळ्या घालण्याची धमकी देऊन कोयत्याने हल्ला केला; त्यात दोघे जखमी झाले. संशयिताकडे पिस्तूल असती तर काय स्थिती झाली असत? गावठी कट्टा सहज उपलब्ध होत आहे. आपण वाळवा तालुक्यात आहोत की बिहारमध्ये? असा प्रश्न पडतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT