स्वप्निल पाटील
सांगली : कोल्हापुरातील चहा कंपनीत व त्यानंतर याच जिल्ह्यातील उदगावमध्ये एका गोठ्यात सुरू असणार्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या. पण त्यापूर्वीही लाखो रुपयांच्या बनावट नोटा या चलनात आल्या आहेत. घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापार्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे बनावट नोटांची बनवेगिरी थांबणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बनावट नोटा तस्करीचे प्रमुख केंद्र आतापर्यंत तरी कोल्हापूर राहिले आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यातच दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तेथे छापलेल्या बनावट नोटांचे रॅकेट मात्र सांगली आणि मुंबईपर्यंत जाऊन पोहोचले आहे. कोल्हापुरात चहाच्या कंपनीत आणि आता उदगावमध्ये चक्क गोठ्यातच बनावट नोट्या छापण्याचा गोरखधंदा सुरू होता. अर्थात दोन्ही ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली खरी, पण यापूर्वी ज्या बनावट नोटा बाजारात आल्या, त्याचे काय? हा प्रश्न उरतो.
पकडण्यात आलेले संशयित स्वत:ची चामडी वाचविण्यासाठी, हा त्यांचा पहिलाच प्रयत्न आहे असे सांगतात. पण लाखो रुपयांच्या बनावट नोटा या बाजारात आल्याची शक्यता आहे. हुबेहूब पाचशे रुपयांच्या नोटा असल्याने सर्वसामान्य लोकांना सर्रासपणे चुना लावला जात आहे. अर्थात बँकेत गेल्यावरच त्या बनावट नोटा आहेत हे कळेल, अशा त्या नोटा बनविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची फसगत तर होणारच. त्यामुळे आता व्यापार्यांचेही धाबे दणाणलेे आहेत. घाऊक व्यापारी, किराणा दुकानात, पेट्रोल पंपावर गेल्यावर ग्राहकाने पाचशे रुपयांची नोट काढली, की आता मालकाचे डोळेही विस्फारू लागले आहेत. प्रत्येक ठिकाणी पाचशे रुपयांची नोट दिसली की, ती तपासल्याशिवाय कोणीही घेत नाही, अशी अवस्था झाली आहे. अर्थात ते बरोबरही आहेच, कारण यापूर्वी लाखो रुपयांच्या नोटा या बाजारात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे व्यावसायिक आणि व्यापार्यांकडून खबरदारी घेतली जात आहे आणि ती बरोबरही आहेच. हे झाले ज्यांच्याकडे नोटा तपासणीचे मशीन आहे त्यांचे. पण ज्यांच्याकडे नोटा तपासणीचे मशीन नाही, त्यांचे काय? त्यांना कोण ना कोण गंडा घालणारच. रस्त्यावर बसून जे व्यापारी व्यापार करतात, ते कोठून नोटा तपासणीचे मशीन आणणार? खरंय ना? त्यामुळे यावर उपाय म्हणजे ऑनलाईन बँकिंग! आता सर्रास सर्वांकडे ऑनलाईन बँकिंगची सुविधा आहे. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त वापर केला, तर व्यवहारात पारदर्शीपणा येईल किंवा ज्या व्यापार्यांना शक्य आहे, त्यांनी नोटा तपासणीचे मशीन घेणे गरजेचे आहे. त्यामुळे बनावट नोटा बाजारात येणार नाहीत आणि आल्याच तर त्या ताबडतोब पकडल्या जातील.
आता तर निवडणुकांचा हंगाम सुरू होत आहे. यामध्ये बनावट नोटा चलनात येण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात पकडण्यात आलेल्या नोटा या कमिशनवर देण्यात येत होत्या. काही राजकीय नेत्यांकडून त्यांचा वापर होऊ शकला असता, पण त्या वेळीच पकडल्या गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. कोल्हापुरातील रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर आता बनावट नोटांचे प्रकरण संपले असे वाटत असतानाच, कोल्हापूर जिल्ह्यातीलच उदगाव येथे एका गोठ्यामध्ये थाटण्यात आलेल्या बनावट नोटांचे रॅकेट इचलकरंजी पोलिसांनी उघडकीस आणले. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी बनावट नोटा छापण्याचे रॅकेट सुरू असल्याचे स्पष्टच होते. पोलिसांच्या हाती जसजसे पुरावे लागतील, तशी कारवाई होतच राहील. पण त्यापूर्वी बाजारात आलेल्या बनावट नोटांचे करायचे काय? असा यक्षप्रश्न उरतोच. त्यामुळे दिवसेंदिवस बनावट नोटांच्या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याने याची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. याचा मोठा फटका हा रस्त्यावरील व्यापार्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनीही बनावट नोटांच्या बाबतीत आता दक्ष असणे गरजेचे आहे. कारण आपल्याला समजणारच नाही, की आपल्या हातातील नोटा बनावट आहे की खरीखुरी. यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन बँकिंगचा वापर केल्यास बनावट नोटा बाजार येण्यास चाप बसेल व सर्वसामान्यांच्या होणार्या फसवणुकीलाही आळा बसेल.
बनावट नोटांची पाळेमुळे खोलवर...
पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बनावट नोटा छापण्याचे रॅकेट सुरू आहे. ते कोणीही नाकारू शकत नाही, कारण पोलिसांनी यापूर्वी केलेल्या कारवाया! पण या रॅकेटशी संबंधित असणारे काहीजण अद्याप मोकाट आहेत. त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला नसला तरी अप्रत्यक्ष संबंध कोठे ना कोठे आला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या मुसक्या आवळणेही गरजेचे आहे. कारण त्यांना आता मोकाट सोडल्यास, अन्य कोणाच्या तरी सहकार्याने ते बनावट नोटांचा कारखाना थाटू शकतात. त्यामुळे बनावट नोटांच्या प्रकरणाशी निगडित असणार्या कोणालाही पोलिसांनी बगल देऊ नये, अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे. तशी प्रतिक्रिया देखील उमटत आहे.
बनावट नोटांसाठी विशेष कागद
भारतात ज्या कागदांच्या नोटा बनविल्या जातात, तो कागद विशिष्ट प्रकारचा असतो. तसेच तो कागद फक्त आरबीआयकडेच असतो असे सांगितले जाते. पण त्या कागदाशी मिळते जुळते कागद सर्वत्र उपलब्ध होत आहेत. कोल्हापुरात छापण्यात आलेल्या नोटांचे कागद पुण्यातून खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे ते कागद कोण खरेदी करते? कशासाठी खरेदी केले जात आहेत? याची चाचपणी गरजेची आहे.
मतदार हो... सावधान!
आता निवडणुका येऊ घातल्या आहेत. निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असतात. यामध्ये बनावट नोटांचा वापर होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. पण मतदार हो... आपणही सावध राहा! तुमचे मत बनावट नोटांच्या आधारे विकत घेतले जाऊ शकते. अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचून याचा भांडाफोड करणे गरजेचे आहे.