सांगली भटकी कुत्री Pudhari Photo
सांगली

‘आई रात्री घरी येताना कुत्री अंगावर येतात’

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

‘आई कामावरून रात्री घरी येताना कुत्री अंगावर धावून येतात. माळी चित्रमंदिर, चांदणी चौक, बापट मळा, मालू हायस्कूल रोड परिसरात रात्री रस्त्यावर कुत्री मोठ्या संख्येने असतात. त्यांचा बंदोबस्त करावा’, अशा तक्रारीचे पत्र आठवीतील विद्यार्थ्याने जिल्हाधिकारी व आयुक्तांना पाठवले आहे. त्याची दखल घेत कुत्र्यांसह मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम तीव्र करण्याचे निर्देश देण्यात आले. कुमार स्तवन वाघिला या विद्यार्थ्याने गुलमोहर कॉलनी, मेट्रो मॉल परिसरातील भटक्या कुत्र्यांबाबतची तक्रार पत्राद्वारे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे केली आहे. प्रभाग क्रमांक 17 मधील माळी चित्रमंदिर, चांदणी चौक, बापट मळा, मालू हायस्कूल रोड, शिवाजी ओऊळकर मार्ग येथे रात्री रस्त्यावर कुत्री मोठ्या संख्येने असतात.

रात्री जेवणानंतर शतपावलीस जाणार्‍या नागरिकांवर ही कुत्री भुंकतात, अंगावर धावून जातात. आई एका इलेक्ट्रॉनिक दुकानात कामाला आहे. तिला घरी परत येण्यास रात्री उशिर होतो. कधी कधी एक-दोनही वाजतात. त्यावेळी आई व मी घरी येताना रस्त्यावरील कुत्री आमच्या अंगावर येतात. महापालिका क्षेत्रात रस्त्यांवर मोकाटपणे फिरणारी कुत्री तसेच मोकाट घोडे, गायी, गाढवे पकडण्याची कारवाई तीव्र करण्याचे निर्देश महापालिकेच्या प्रशासकीय महासभेत आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्व सहायक आयुक्त आणि उपायुक्तांना दिले. आरोग्याधिकारी (स्वच्छता) डॉ. रवींद्र ताटे यांनी संबंधित भागात डॉग व्हॅन पाठवून काही कुत्री पकडली. त्यावरून संबंधित विद्यार्थ्याने महापालिकेला आभार पत्रही पाठवले.

दैनंदिन अहवाल मागवला

स्वच्छता निरीक्षक, सहायक आयुक्त आणि मुकादम यांनी कुत्री, जनावरे पकडण्याची कार्यवाही करून दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांनी सूचना देऊन सहकार्य करावे. आरोग्याधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील ताटे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.

मोकाट सात जनावरे कोंडवाड्यात

महापालिकेकडून शहरातील भटक्या जनावरांना कोंडवाड्यात रवाना करून त्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. मोकाट सात जनावरे पकडून महापालिकेच्या कोंडवाड्यात ठेवली आहेत. भटकी कुत्री मोठ्या संख्येने पकडून त्यांची नसबंदी, शहराच्या बाहेर निवारा शेड उभारणे आदी कार्यवाही करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT