सांगली/इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा अखेर राजीनामा दिला. बहुचर्चित अशा या विषयावर तूर्त एक तरी पडदा पडला. आता तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकीय पटलावर त्यांच्या नव्या वाटचालीविषयी तर्क-वितर्क सुरू झाले. ते कोणती भूमिका घेणार, याविषयी उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 1999 च्या स्थापनेपासून आमदार पाटील सतत पहिल्या फळीत राहिलेले नेतृत्व. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे पक्षातील विश्वासू सहकारी. त्यांच्या राजीनाम्यानंतर वाळवा तालुक्यात त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकार्यांसह सामान्यांत ते यापुढे काय करतील, याचे अंदाज बांधले जात होते. त्याचे पडसाद समाजमाध्यमातही उमटत आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले जयंत पाटील यांची प्रतिमा राज्यभर आणखी उजळ झाली होती. मात्र नंतरच्या विधानसभा निवडणुकीत याच पक्षाची जोरदार दमछाक झाली. अर्थात या विधानसभा निवडणुकीत अनेक मातब्बरांना पराभवाचे धक्के बसले. जे काही हाताच्या बोटावर मोजणारे सावरले, तेही अवघ्या शे - पाचशे मताधिक्याने निवडून आले. आमदार जयंत पाटील यांचेही सात विधानसभा निवडणुकीतील मताधिक्य घसरले. ते 13 हजार मतांनी विजयी झाले.
जयंतराव भाजपकडे झुकणार नाहीत, असे बोलले जाते, तर काहींच्यामते भाजपमधील राज्य आणि केंद्रीय स्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांशी त्यांचे असलेले सख्य पाहता, त्यांना भाजपची दारे खुली असतील, असा एक मतप्रवाह आहे. ते आता भाजपमध्ये की काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी 10 जूनरोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापनदिनीच केली होती. मला पवारसाहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहर्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवारसाहेबांचा आहे. शरद पवारांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असे ते म्हणाले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याविषयीचा एक अंदाज खरा ठरला.
ते भाजपबरोबर जाणार, अशा चर्चा अनेकवेळा झाल्या; मात्र त्याचा इन्कार करीत त्यांनी पुरोगामी विचार सोडणार नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा, अजित पवार यांची भाजपशी वाढलेली जवळीक या राजकीय पार्श्वभूमीवर आमदार जयंत पाटील आता पुढे पक्षात राहणार, का भाजपमध्ये की राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे जाणार, याची उत्सुकता आहे. इतकेच नव्हे, तर ते काँग्रेसमध्ये जातील असाही अंदाज काहीजण व्यक्त करीत आहेत.
वयाच्या 28 व्यावर्षी जयंत पाटील यांनी इस्लामपूर-वाळवा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 30 वर्षांपासून ते या मतदारसंघाचे सातवेळा प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी 1999 ते 2008 या काळात राज्याचे अर्थमंत्री म्हणून नऊवेळा अर्थसंकल्प मांडला. 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर आर. आर. पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला, तेव्हा जयंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्रीपद स्वीकारले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी ग्रामविकासमंत्री म्हणून काम केले.