सरत्या वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्राला विशेषतः सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला वंदे भारत रेल्वेचे गिफ्ट मिळाले. तसेच पुणे-मिरज-लोंढा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले. काही रेल्वे गाड्यांचा विस्तार केला. त्यामुळे कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील प्रवाशांची सोय झाली.
पुणे-मिरज-लोंढा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणामुळे मिरज रेल्वे जंक्शन हे फास्टट्रॅकवर आले. मिरज जंक्शनसह सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा आणि कोल्हापूर रेल्वे मार्गावरील हातकणंगले आणि कोल्हापूर ही दोन रेल्वे स्थानके अमृत भारत योजनेअंतर्गत विकसित केली आहेत. केंद्र सरकारने फेब्रुवारी 2023 मध्ये देशभरातील 1 हजार 275 रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेत समावेश केला आहे.
याअंतर्गत येणार्या सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांच्या विकासाला सुरुवात झाली आहे. मिरज रेल्वे जंक्शन मॉडेल स्थानकामध्ये समावेश केले आहे. त्याचा आराखडा देखील तयार आहे. कोकण रेल्वेकडून मिरज रेल्वे जंक्शनचा विकास करण्यात येणार आहे. तसेच पुण्यापर्यंत आणि हुबळीपर्यंत धावणार्या रेल्वे गाड्यांचा मिरजपर्यंत विस्तार करावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. ही मागणी मात्र पूर्ण झाली नाही. पुण्यापर्यंत धावणार्या रेल्वे गाड्यांचा मिरजेपर्यंत विस्तार करण्यासाठी मिरज रेल्वे जंक्शनवर 24 बोगींचे पिटलाईनचे काम देखील पूर्ण झाले आहे. मिरजेत 24 बोगींची पिटलाईन तयार असल्यामुळे पुणे, हुबळीपर्यंत धावणार्या रेल्वे गाड्यांचा विस्तार येणार्या वर्षात होणे शक्य आहे.
मिरज आणि कोल्हापूरमधून वंदे भरत एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी होती. त्याला रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद देत हुबळी ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली आहे. तीन महिन्यापासून ही वंदे भारत एक्स्प्रेस धावत असून प्रवाशांची उत्तम सोय झाली आहे. तसेच एका दिवसात पुण्याला जा- ये करणे शक्य झाल्याने रेल्वे प्रवाशांचा वंदे भरत एक्स्प्रेसला वाढता प्रतिसाद आहे.
कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस देखील येत्या वर्षात मिळण्याची शक्यता आहे. ही वंदे भारत देखील पश्चिम महाराष्ट्राला मिळाल्यास प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. तसेच मिरज ते दादर व्हाया पंढरपूर धावणार्या एक्स्प्रेसचा सातार्यापर्यंत विस्तार करण्यात आला. मिरज ते बेंगलोर राणी चन्नम्मा एक्स्प्रेसचा देखील सांगली स्थानकापर्यंत विस्तार केला आहे. त्यामुळे दक्षिणेत जाण्यासाठी सांगलीकरांची उत्तम सोय झाली. कोल्हापूर, मिरज, सांगलीमधून मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांची महालक्ष्मी एक्स्प्रेसला पसंती असते. महालक्ष्मी एक्स्प्रेसला एलएचबी कोच जोडले आहेत. त्यामुळे प्रत्येक कोचमध्ये 20 बर्थची संख्या वाढली आहे. बर्थची संख्या वाढल्यामुळे प्रवाशांची देखील सोय झाली आहे.
तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी बेळगाव आणि पुणे ही दोन मोठी शहरे जोडण्यासाठी इंटरसिटी एक्स्प्रेसला मंजुरी दिली होती. परंतु त्यांच्या निधनानंतर या इंटरसिटी एक्स्प्रेसचा विषयच बारगळला. बेळगाव ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर दोन्ही मोठी शहरे जोडली जाणार आहेत. परंतु आगामी वर्षात तरी ही इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू होते का, हे पाहावे लागेल.
मिरजमार्गे धावणार्या हुबळी ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे या वंदे भारत यापूर्वीच मिळाल्या आहेत. पुणे ते बेळगाव या नव्या वंदे भारतची घोषणा नुकतीच केली आहे. पुण्यातून येत्या काही दिवसात सहा नव्या वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. यामध्ये पुणे ते बेळगाव वंदेभरात एक्स्प्रेसचा देखील समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
हुबळी-पुणे-कोल्हापूर पुणे वंदे भारत सुरू
मिरज-दादर व्हाया सोलापूरचा सातारापर्यंत विस्तार
मिरज - बेंगलोर राणी चन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीपर्यंत विस्तार
लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना सांगली, किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबा
महालक्ष्मी एक्स्प्रेसला एलएचबी कोच
पुणे, हुबळीपर्यंत धावणार्या एक्सप्रेस गाड्यांचा मिरज पर्यंत विस्तार नाही
पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि बेळगाव रेल्वे मार्गावर एकही नवी रेल्वे गाडी नाही
अमृत भारत मध्ये समावेश होऊन देखील रेल्वे स्थानकांच्या विकासाला अद्याप सुरुवात नाही
कोरोना काळात बंद झालेल्या गाड्या पुन्हा सुरू झाल्या नाहीत.