जत शहर : जत तालुक्याच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपयाचा निधी आणला. दहा वर्षात प्रचंड जनसंपर्क आणि जनतेसाठी 24 तास काम करूनही येथील पराभव काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र हार न मानता नव्या उमेदीने लढाई सुरू ठेवूया, जतमध्ये पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवूया, असे प्रतिपादन माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली.
जत येथे महाविकास आघाडीच्या वतीने चिंतन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते अप्पराय्या बिरादार, बाजार समितीचे सभापती नाना उर्फ सुजय शिंदे, शहर अध्यक्ष नीलेश बामणे, शिवसेना तालुका प्रमुख अमित दुधाळ, उपप्रमुख शिवाजीराव पडोळकर, बाजार समितीचे संचालक बाबासाहेब माळी, जिल्हा बँकेचे संचालक राम सरगर, रावसाहेब मंगसूळ, सरपंच मारुती पवार आदी उपस्थित होते. सावंत म्हणाले, तालुक्यातील 75 हजार मतदारांनी मला मतदान केले आहे. त्यांचे मत वाया न घालवता तालुक्याच्या विकासासाठी काम करत राहू.