सांगली: अल् निनोच्या संभाव्य परिणामामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये, यासाठी आतापासूनच गावा-गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेत बदल करणे आणि ग्रामस्थांमध्ये पाणी बचतीबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दिवसातून दोन वेळा किंवा दररोज पाणीपुरवठा केला जातो. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करून काटकसरीने वापर करण्याची वेळ आता आली आहे.
पाणी ही अमर्यादित उपलब्ध असलेली बाब नसून, उपलब्ध साठ्याचा विचार करूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी नळ सुरू ठेवणे, वाहन धुण्यासाठी किंवा अंगण धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणे, नळातून होणाऱ्या पाणी गळतीकडे दुर्लक्ष, यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते.
भविष्यातील संभाव्य संकट लक्षात घेता प्रत्येक गावाने पाणी बचतीला लोकचळवळीचे स्वरूप देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत, पाणीपुरवठा विभाग, सामाजिक संस्था, महिला बचत गट, युवक मंडळे आणि शाळा यांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवून ग्रामस्थांना जबाबदारीची जाणीव करून देण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच गावातील उपलब्ध जलस्रोत, विहिरी, बंधारे आणि पाणीसाठ्यांचा आढावा घेऊन दीर्घकालीन नियोजन करण्यावरही भर देणे आवश्यक आहे.
नागरिकांनी पाणी कसे वापरावे?
आवश्यक तेवढेच पाणी वापरावे, नळ सुरू ठेवून पाणी वाहू न देणे. कपडे, भांडी धुण्यासाठी पाण्याचा माफक वापर करावा. वाहने धुणे थांबवावे किंवा कमी पाण्यात धुवावे. घरातील वापरलेले पाणी झाडांना किंवा इतर उपयोगासाठी पुनर्वापर करावे. मुलांमध्ये आणि कुटुंबामध्ये पाणी बचतीच्या सवयी रुजवावी.
पाणीपुरवठ्यात अपेक्षित बदल...
दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याऐवजी गरजेनुसार वेळापत्रक निश्चित करावे. उपलब्ध पाणीसाठ्यानुसार एक दिवसआड किंवा नियोजित कालावधीत पाणीपुरवठा करावा. प्रत्येक गावात 'पाणी अंदाजपत्रक' तयार करून उपलब्ध साठ्याचा मासिक आढावा घ्यावा. गळती असलेल्या पाईपलाईन आणि नळांची तातडीने दुरुस्ती करावी. नवीन बोअरवेल खोदण्यापेक्षा सध्याच्या जलस्रोतांचे संवर्धन करावे. शक्य असल्यास पाणी मोजून आणि नियोजनबद्ध पद्धतीने सोडण्याची व्यवस्था करावी.