शिराळा शहर : वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी शुक्रवार, दि. 2 पासून चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. शनिवार, दि. 3 पासून खिरवडे व हातेगाव येथील पंप हाऊस सुरू होतील. वाकुर्डे योजनेच्या पाण्याचे योग्य नियोजन करून सर्व टँक व तलाव भरून घ्यावेत, अशा सूचना आमदार सत्यजित देशमुख यांनी केल्या.
वाघवाडी येथे वारणा डावा कालवा योजनेच्या कार्यालयात शुक्रवारी वाकुर्डे योजनेच्या पाण्यासंदर्भात मागील आठवड्यात झालेल्या बैठकीतील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू करण्यात आला आहे. शनिवारी खिरवडे व हातेगाव येथील पंप हाऊस सुरू होऊन पाणी करमजाई धरणात येईल. करमजाई धरण भरून पुढे पाणी रेठरे धरण, कार्वे, ढगेवाडी, शिवपुरी, जक्राईवाडी, सुरूल, ओझर्डेपर्यंत पी.डी.एन.मधून मायनरला पोहोचेल. पाण्याचे 15 दिवसाचे योग्य नियोजन करा. तोरणा ओढ्यातून पाणी खाली येईल, अशा पद्धतीचे योग्य नियोजन करा. शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये.
यावेळी वारणा डावा कालवाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, उपअभियंता सतीश पाटील आदी उपस्थित होते.
सध्या वीजनिर्मिती केंद्रातून 1000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तसेच वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता डाव्या कालव्यात 200 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली असून त्यामध्ये हळूहळू वाढ करून 300 क्युसेकपर्यंत विसर्ग केला आहे.- बाबासाहेब पाटील, उपविभागीय अभियंता