Sangli: While the work of repairing the leakage of the main water supply channel is in progress.
सांगली : पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनीची गळती दुरुस्तीचे काम सुरू असताना.  Pudhari Photo
सांगली

सांगलीतील अनेक भागात ‘पाणीबाणी’

पुढारी वृत्तसेवा

सांगली, पुढारी वृत्तसेवा : माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रावरून हिराबाग वॉटर वर्क्सकडे येणार्‍या जलवाहिनीला हिराबाग येथे मोठी गळती लागली. शनिवारी रात्री आठ टाक्यांचा पाणीपुरवठा थांबवावा लागला. त्यामुळे शनिवारी सकाळी शहराच्या मुख्य भागाला पाणी मिळू शकले नाही. परिणामी सव्वा लाख नागरिकांची तारांबळ उडाली. रविवारीही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सोमवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

माधवनगर रोडवरील माळबंगला येथे महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. तिथून सांगलीत हिराबागकडे आठशे एमएम व्यासाची मुख्य जलवाहिनी येते. या जलवाहिनीच्या पाण्याद्वारे हिराबाग येथील जुनी व नवीन टाकी (जलकुंभ), सांगलीवाडी येथील 2 टाक्या, तसेच आकाशवाणी, विश्रामबाग, जलभवन व हनुमाननगर येथील प्रत्येकी एक टाकी, अशा एकूण 8 टाक्या भरल्या जातात. शुक्रवारी रात्री उशिरा हिराबाग येथे जलवाहिनीच्या जॉईंटला मोठ्या प्रमाणात लिकेज झाले. या जलवाहिनीचा पाणीपुरवठा थांबवण्यात आला. त्यामुळे शनिवारी 13 रोजी सांगलीतील गावभाग, खणभाग, पेठभाग, उत्तर शिवाजीनगर, वखारभाग, कर्नाळ रोड, हरिपूर रोड, कोल्हापूर रोड, भरतनगर, गणेशनगर, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, शंभरफुटी, रमामातानगर, हनुमाननगर आदी परिसरात पाणीपुरवठा झाली नाही.

शनिवारी पाणी न आल्याने परिसरातील 1.25 लाख नागरिकांची गैरसोय झाली. रविवारी 14 रोजीही पाणी बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पिण्याचे पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे विशेष कार्य अधिकारी सुनील पाटील, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी केले आहे. दुुपारपर्यंत या भागाला पाणी शक्य. जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीसाठी 8 टाक्यांचे पाणी बंद आहे. दुरुस्तीचे काम जोरात सुरू आहे. शनिवारी रात्री अथवा पहाटेपर्यंत दुरुस्तीचे काम होईल. त्यामुळे हिराबागच्या दोन टाक्या वगळता अन्य 6 टाक्यांच्या क्षेत्रातील भागात रविवारी दुपारपर्यंत कमी प्रमाणात पाणी मिळू शकेल. काँक्रिट ब्लॉकसाठी हिराबागच्या दोन टाक्यांकडील भागात रविवारीही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान सोमवारी सकाळी या सर्व 8 टाक्यांकडील भागात पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे, असे सुनील पाटील यांनी सांगितले.

हलगर्जीपणा नडतोय : भाजप महिला मोर्चाची टीका

पाणीपुरवठ्याचे व्हॉल्व्हमन व इतर कर्मचार्‍यांकडून व्हॉल्व्हची हाताळणी करत असताना चूक झाल्यामुळे टाक्यांना जोडलेल्या पाईपलाईन सरकल्या आहेत. कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिक वैतागले आहेत. कामकाज न सुधारल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. स्वाती शिंदे यांनी दिला आहे. पाणीपुरवठा बंद असलेल्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी उदय बेलवलकर, आशिष साळुंखे, गजानन मोरे, श्रीधर मिस्त्री, चेतन भोसले उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT