शिराळा शहर : शिराळा तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत असून तलाव, विहिरी कोरड्या पडल्या असून पाण्याची प्रचंड मागणी वाढली आहे. अजून एक महिना ही टंचाई जाणवणार असून पाणीपुरवठा विभाग व पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी काटेकोरपणे नियोजन करण्याची गरज आहे.
तालुक्यातील 49 तलावांपैकी 25 तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. प्रशासकीय अधिकारी व शेतकरी यांनी योग्य नियोजन न केल्यास तालुक्यातील लोकांना पुढील काळात शेतीसाठी पाणी मिळणार नाही. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे. गतवर्षी एप्रिल, मे महिन्यात साधारणतः सरासरी 35 ते 38 डिग्री तापमानाची नोंद झालेली दिसून येत होती. परंतु यावर्षी फेब्रुवारी, मार्च व मे चा पहिला आठवड्यामध्येच सरासरी तापमान हे 39 अंश ते 40 अंशाच्या घरात गेले आहे. उन्हाच्या तीव्र झळा जीव कासावीस करत आहेत. सुदैवाने अजूनही प्रशासनाकडे कोणत्याही गावाने टँकरसाठी मागणी केलेली नाही.
काही दिवसांत सर्व पाझर तलाव कोरडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या तलावाच्या बुडीत क्षेत्रात तसेच खालील बाजूस पाणीपुरवठा योजनेच्या उद्भव विहिरी, विंधन विहिरी आहेत,अशा उद्भवाच्या स्रोतास पाणी कमी पडण्याची दाट शक्यता आहे. जनावरांना व लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार आहे.
शिराळा तालुक्यात मे च्या पहिल्या आठवड्यात 49 पैकी कोरडे ठणठणीत पडलेले 25 तलाव पुढील प्रमाणे: हातेगाव (अंबाबाई वाडी), शिरसी (गिरजवडे रोड), शिरसी (काळे खिंड), शिरसी (कासारदरा), पाचुंब्री, करमाळे नंबर, शिवारवाडी, भैरववाडी, निगडी जुना (कासारदरा), निगडी (खोकड दरा), इंग्रूळ, पावलेवाडी नंबर 1 आणि 2, कोंडाईवाडी नंबर 1 आणि 2, धामवडे, तडवळे वडदरा, तडवळे 1, भाटशिरगाव , सावंतवाडी, शिरशी नंबर 1, चरणवाडी नंबर 1(चरण), चव्हाणवाडी (येळापूर), बेलदारवाडी आणि प. त. शिराळा हे तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत.
जलसंधारण अधिकारी प्रवीण तेली म्हणाले, सर्व तलावांच्या बुडीत व संपादित क्षेत्र परिसरातील तसेच आजूबाजूच्या शेतकर्यांनी कोणत्याही परिस्थितीत तलावामध्ये थेट पंपिंग मशिनरी टाकून अथवा इंजिनद्वारे पाणी उपसा करू नये. उपसा केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. शेतकरी बांधवानी प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे. जेणेकरून मे अखेर किंबहुना मान्सून पूर्व पाऊस होईपर्यंत तरी तलावातील पाणीसाठा टिकून राहील. त्याचा अप्रत्यक्ष सिंचनांद्वारे निश्चितपणे शेतकर्यांना लाभ होईल.