नागज : अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिल्याने शिवगोंडा भीमा खरोशे (वय 75 रा. दत्तवाड ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) या दिंडीतून पंढरपूरला निघालेले वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठलवाडी (ता. कवठेमहांकाळ) गावाजवळ सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी, शिवगोंडा खरोशे हे कार्तिकी वारीनिमित्त दिंडीतून चालत पंढरपूरला निघाले होते. दरम्यान, विठ्ठलवाडी गावाजवळ जुनोनीच्या दिशेने निघालेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने (क्र.एमएच 45 आर 8918) चालत निघालेल्या शिवगोंडा खरोसे यांना जोरात धडक दिली. अपघातात वर्मी मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर दुचाकीस्वाराने दुचाकी घटनास्थळी सोडून पलायन केले. या घटनेची नोंद सोमवारी रात्री उशिरा कवठेमहांकाळ पोलिसांत झाली. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात कवठे-महांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.