ऐतवडे खुर्द-वारणा नदीच्या पुराचे पाणी असे ऊस शेती पिकात शिरले आहे.  (छाया- जयसिंग पाटील)
सांगली

Warana River Flood : वारणा धोक्याच्या पातळीवर; सतर्कतेचा इशारा

चांदोलीत उघडीप, शिराळ्यात घरांची पडझड, शेती पाण्याखाली, अलमट्टीतून विसर्ग सुरू

पुढारी वृत्तसेवा

जयसिंग पाटील

सांगली : शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चांदोली अभयारण्य परिसरात आज पावसाने काहीशी उघडीप दिली आहे, पण शिराळा तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड सुरू झाली असून वारणा नदीने धोक्याची पातळी गाठत पात्राबाहेर वाहण्यास सुरुवात केली आहे. वारणा काठावर मगरींचे दर्शन व्हायला लागले आहे. कृष्णा-कोयना-वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने सांगली पाटबंधारे विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

वारणेच्या नदीला पावसाची संतधारमुळे पूर आला असून यामुळे नदीकाठावरील शेती पिकात पाणी शिरले आहे. सध्या हा पूर किरकोळ प्रमाणात असला तरी भविष्यात शक्तिपीठ महामार्गाचा भराव झाल्यास नदीकाठच्या गावाचे, शेतीचे होणार काय, याची मोठी धास्ती नदी काठावरील शेतकर्‍यांना आतापासूनच लागून राहिली आहे.

शक्तिपीठ महामार्गामुळे सर्वात जास्त ऐतवडे खुर्द येथे १८२ एकर शेती जाणार असून या शेतीबरोबरच मोठा भराव झाल्यास संपूर्ण शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा महामार्ग होऊ नये यासाठी नदीकाठावरील ग्रामपंचायतीने यासाठी ठराव केले असून सर्व पाणीपुरवठा संस्था, पतसंस्था, बँका, शिक्षण संस्था आदींनी ठराव करून शासनाला पाठवले आहेत. याबाबत हरकती प्रशासनाकडे दाखल केले आहेत. लोकप्रतिनिधींना निवेदन दिले आहे, परंतु याबाबत प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने शेतकरी या परिसरातील संतप्त आहे.

पुढील पिढीची चिंता...

ज्या वारणा नदीमुळे सुजलम्‌-सुफलम्‌ भाग या परिसरात झाला. ऊस, भात, सोयाबीन प्रमुख पिके आहेत. त्याच शेतीला, नदीला भराव घातल्यास संपूर्ण गाव, शेती उद्ध्व‌स्त होणार आहे. यामुळे पुढील पिढीने करायचे काय, याची चिंता आतापासूनच शेतकर्‍यांना लागून राहिली आहे.

नदीकाठाला इशारा

पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी सांगितले की, दि. ९ जुलैरोजी सकाळी ८ वाजता कृष्णा नदीवरील आयर्विन पूल येथे पाणीपातळी २६ फूट ९ इंच इतकी आहे. ८ जुलैच्या रात्री पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे कृष्णा नदीच्या आयर्विन पुलावरील पाणीपातळीत आणखी वाढ होऊन ९ जुलैच्या रात्रीपर्यंत ती अंदाजे ३० ते ३२ फुटांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ, शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

वारणा धरणात १९.५२ टी.एम.सी.

वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत १९.५२ टी.एम.सी.पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी आहे. विविध धरणांतील पाणीसाठा व साठवण क्षमता (कंसात टी.एम.सी.)कोयना ४९.७५ (१०५.२५), धोम ७.९९ (१३.५०), कन्हेर ८.१८ (१०.१०), धोम बलकवडी २.९८ (४.०८), उरमोडी ५.६१ (९.९७), तारळी २.८२ (५.८५), वारणा १९.५२ (३४.४०), राधानगरी ४.९० (८.३६), दूधगंगा ७.१३ (२५.४०), तुळशी १.९० (३.४७), कासारी १.४५ (२.७७), पाटगांव १.७२ (३.७२), अलमट्टी ४४.७० (१२३).

संपर्क करा

पाऊस, संकटकालीन परिस्थितीत किंवा माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाशी ०२३३-२३०१८२०, २३०२९२५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

विसर्ग सुरू

कण्हेर धरणातून ६४०, उरमोडी १०, तारळी १००, दूधगंगा १०० व अलमट्टी धरणातून ४८३ क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT