इस्लामपूर : वाळवा तालुक्यात खरिपाचा 63 टक्के पेरा झाला आहे. 9 हजार 300 हेक्टर क्षेत्र लागवडीविना पडून आहे. यावर्षी 25 हजार 564 हेक्टर खरिपाचे अंदाजित क्षेत्र आहे. आता, खरीप टोकणी-पेरणीचा हंगाम संपत आल्याने शेत पडून राहण्याची भीती आहे. शेतकर्यांचा सखल भागातील शेतात भात लावण्याकडे कल आहे. अडीच महिने पडत असल्याने पावसाने पेरण्या रखडल्या आहेत.
1 जूनपासून 22 जुलैपर्यंत 291 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अजूनही सखल भागातील शेतात पाणी साचून राहिले आहे. मशागती लांबल्या. शेताला वापसा नसल्याने पेरण्या रखडल्या. परिणामी 9 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र पडिक आहे.
तालुक्यात खरीप पिकांची झालेली लागवड अशी, भाताचे अंदाजित क्षेत्र 1 हजार 604 हेक्टर आहे. त्यापैकी 779 हेक्टरवरती पेरणी झाली आहे. खरीप ज्वारी, मका याचा 5-5 हेक्टरवरती पेरा झाला आहे. बाजरी, नाचणी, तूर, मूग या बियांची टोकणी-पेरणी झालेली नाही. उडिदाचा केवळ 1 हेक्टरवरती पेरा झाला आहे. भुईमुगाचे अंदाजित क्षेत्र 7 हजार 928 हेक्टर आहे, त्यापैकी 6 हजार 645 हेक्टरवर पेरा झाला. सोयाबीनची 14 हजार 902 हेक्टर क्षेत्रापैकी 8 हजार 821 हेक्टरवर लागवड झाली आहे. तीळ, कारळा, सूर्यफूल याचा अजून पेरा झालेला नाही. आले 50 हेक्टर, हळदीची 302 हेक्टरवर लागवड झाली आहे. सखल भागातील शेतीत पाणी साचल्याने भात लावण करण्याकडे शेतकर्यांचा कल आहे.
तालुक्यात यावर्षी सुमारे 16 हजार हेक्टर आडसाली लावणीचे क्षेत्र आहे. जादा पाऊस पडल्याने आडसाली ऊस लावणी लांबल्या आहेत. आतापर्यंत फक्त 5 हजार 136 हेक्टरवरती आडसाली लावणी झाल्या आहेत. सन 2025- 2026 या गळीत हंगामासाठी तालुक्यात 33 हजार 565 हे. उसाचे क्षेत्र उपलब्ध आहे.