Pudhari
सांगली

Sangli Crime: वाळव्यातील खुनीहल्ल्याबद्दल दोघांना सक्तमजुरीची शिक्षा

खटला मागे घेण्यासाठी चाकूने भोसकले होते

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : न्यायालयातील खटला मागे घेण्यासाठी युवकावर चाकूने खुनीहल्ला केल्याप्रकरणात दोषी धरून न्यायालयाने वाळवा येथील दोघांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

रोहन ऊर्फ रोह्या हणमंत मुळीक (वय 23) याला 10 वर्षे व त्याचा साथीदार अल्फाज फिरोज मुल्ला (वय 22) याला 3 वर्षे अशी शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायाधीश अनिरुद्ध थत्ते यांनी ठोठावली. अडीच वर्षापूर्वी वाळवा येथे हा खुनीहल्ल्याचा प्रकार घडला होता. संदेश अशोक कदम (वय 30, रा. वाळवा) हा हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता.

2018 साली रोहन याने संदेश याच्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी ईश्वरपूर न्यायालयात खटला सुरू होता. रोहन याने संदेश याच्यावर दोनवेळा हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यात वरचे वर वाद होत होते. 6 नोव्हेंबर 2023 रोजी संदेश हा बाराबीगा परिसरात रस्त्याकडेला उभा होता. त्यावेळी रोहन, अल्फाज हे दुचाकीवरून तेथे गेले. कोर्टातील केस मागे घे, नाही तर तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून रोहन याने चाकू संदेश याच्या पोटात भोसकला.

संदेश याचे वडील अशोक यांनी दोघांविरोधात आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. न्यायाधीश थत्ते यांच्यासमोरील सुनावणीत 7 साक्षीदार तपासणेत आले. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील रणजित एस. पाटील यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहायक पोलिस उपनिरीक्षक शरद जाधव, उत्तम शिंदे, चंद्रशेखर बकरे यांनी मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT