वाळवा : क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी ज्या साधेपणाने आणि ध्येयवादाने हुतात्मा साखर कारखान्याची पायाभरणी केली होती, त्याची साक्ष आजही कारखान्याची जुनी प्रशासकीय इमारत देत आहे. कारखान्याच्या उभारणीच्या सुरुवातीच्या काळात सिमेंटच्या साठवणुकीसाठी बांधलेले गोदाम आजही मुख्य कार्यालय म्हणून वापरले जात आहे. उष्णतेपासून बचावासाठी या इमारतीच्या पत्र्यावर आजही नारळाच्या झावळ्या टाकलेल्या पाहायला मिळतात.
राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आलिशान आणि वातानुकूलित कार्यालये उभारली असताना, हुतात्मा कारखान्याचे कर्मचारी मात्र आजही या जुन्या इमारतीत काम करत आहेत. गेल्या 42 वर्षांत कारखान्याच्या पायाभूत सुविधांमध्ये कोणताही ठोस बदल झाला नसल्याने, कर्मचारी आणि कामगारांच्या सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत माजी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी म्हणाले, कारखाना सुरू झाला तेव्हा सुमारे 1,100 कामगार होते. नागनाथअण्णांच्या काळात उभारलेल्या इमारती आजही ‘जैसे थे’ आहेत. गेल्या 20 वर्षांत एकही नवीन इमारत उभारली गेली नाही, तरीही कारखान्यावर प्रचंड कर्ज कशासाठी झाले? हा प्रश्न आहे.
हुतात्मा पॅटर्नच्या माध्यमातून साखर उद्योगात उच्चांक गाठणारा आणि ऊस दरासाठी स्पर्धा निर्माण करणारा हा कारखाना आज कर्जाच्या विळख्यात आहे. या दुरवस्थेवरून सध्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या विरोधात किरण नायकवडी, गौरव नायकवडी, केदार नायकवडी यांनी आक्रमक पवित्रा घेत संघर्षाचा लढा उभारला आहे.