वाळव्यात गुंडाचा निर्घृण खून 
सांगली

Walwa Crime : वाळव्यात गुंडाचा निर्घृण खून

तीनजणांवर गुन्हा; दारू पाजून मित्रांनी केला हल्ला

पुढारी वृत्तसेवा

वाळवा : वाळवा-अहिरवाडी रोडवरील रॉयल हॉटेलजवळ देसाई प्लॉट परिसरात सराईत गुंड संदेश ऊर्फ साहील अशोक कदम (वय 30, रा. वाळवा) याचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी साहीलचे वडील अशोक भीमराव कदम यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साहील तडीपार असताना वाळव्यात आला होता.

पूर्वी झालेल्या वादातून साहील याला राजश्री आमसिद्ध कोळी (वय 50, रा. अहिरवाडी रोड, वाळवा) यांच्या घरी बोलावून दारू पाजण्यात आली. त्यानंतर राजश्री यांचा मुलगा प्रथमेश ऊर्फ बबलू कोळी, अभिजित ऊर्फ सोन्या टुमक्या परीट व राजश्री कोळी यांनी काठी व दगडाने त्याच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करून त्याचा खून केल्याचा आरोप आहे. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी प्रथमेश कोळी, अभिजित परीट यांना अटक करण्यात आली आहे. खून केल्यानंतर साहीलचा मृतदेह घराबाहेर अंगणात आणून टाकल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

फिर्यादी अशोक कदम यांनी दिलेल्या जबाबानुसार, साहील याचे प्रथमेशशी मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या घरी मित्रमंडळींसोबत दारू पिणे आणि त्यातून वाद होणे असे प्रकार वारंवार घडत असत. साहील पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर राजश्री कोळी यांनी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला आहे.

दि. 28 रोजी रात्री दारूच्या नशेत साहील व संबंधितांमध्ये भांडण झाल्याचे गावकऱ्यांकडून समजले. त्यानंतर 29 रोजी सकाळी साडेसहा वाजता रॉयल हॉटेलजवळ गर्दी पाहून अशोक कदम यांनी पाहणी केली असता, साहील रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग, काठ्या, दगड तसेच फरशी आढळून आली. साहील हा अविवाहित असून, त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. कृष्णा नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT