शिराळा शहर : येथील मोरणा धरणातील पाणीसाठा वेगाने घटत असल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या धरणात केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सांगली व वारणा पाटबंधारे या विभागांनी जूनच्या 15 तारखेपर्यंत पुरेल इतके पाणी वाकुर्डेतून तातडीने सोडावे, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
मे महिना सुरू झाला तरी मोरणा धरण अजूनही वाकुर्डेच्या पाण्याच्या प्रतीक्षेतच आहे. शेतकर्यांच्या मागणीनुसार योजनेचे पाणी बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे सोडल्यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
दुसरीकडे मोरणा धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. या पाण्यावर पिण्यासह शेतीच्या पाण्यासाठी 20 गावे आणि प्रामुख्याने शिराळा शहर व एमआयडीसीची पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. सध्या या प्रकल्पात 6 दिवसात 3 टक्के पाणी कमी झाले आहे.