सांगली : वाजेगाव (ता. कडेगाव) येथे तीन महिन्यापूर्वी बंद घर फोडून ऐवज लंपास करणाऱ्या रचित ऊर्फ डोक्या इन्कलाब काळे (वय 20, रा. हनुमानगर, ईश्वरपूर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक लाख 66 हजार रुपयांचे दागिने व गुन्ह्यातील दुचाकी, असा 2 लाख 71 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाजेगाव येथील सुमन बाबुराव माने यांचे बंद घर दि. 2 ते 7 डिसेंबरदरम्यान चोरट्याने फोडले होते व घरातून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. याबाबत चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात माने यांनी फिर्याद दिली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक या घरफोडीचा समांतर तपास करीत होते. तेव्हा सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाला तांत्रिक माहितीच्या आधारे रचित ऊर्फ डोक्या काळे याचा या घरफोडीमध्ये सहभाग असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सहायक निरीक्षक वर्धन यांनी त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने दुचाकीवरून (क्र. एमएच 16 डीक्यू 4219) येऊन वाजेगाव येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीतील रोकड त्याने खर्च केली आहे. 1 लाख 66 हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने व दुचाकी, असा 2 लाख 71 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला मुद्देमालासह चिंचणी-वांगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रचित ऊर्फ डोक्या हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.