सांगली : महापालिका निवडणुकीसाठी मतदारयादीचा कार्यक्रम तिसऱ्यांदा सुधारित झाला आहे. प्रारूप मतदारयादीवर दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यासाठी पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अंतिम मतदारयादी बुधवार, 10 डिसेंबरऐवजी आता सोमवार, 15 डिसेंबररोजी जाहीर होणार आहे. दरम्यान, नगरविकास विभागाने महापालिकेकडून यापूर्वीच्या महापौर आरक्षणांची तसेच अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाची लोकसंख्या व आरक्षित सदस्यसंख्या यांची माहिती मागवली आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 14 ऑक्टोबररोजी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 6 नोव्हेंबररोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करणे व प्रारूप मतदार यादीवर हरकती, सूचनांसाठी 14 नोव्हेंबरअखेर अंतिम मुदत दिली होती. त्यानंतरच्या आदेशानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीची तारीख 20 नोव्हेंबर व प्रारूप मतदार यादीवर हरकती, सूचनांसाठी अंतिम मुदत 27 नोव्हेंबर, अशी जाहीर करण्यात आली.
दरम्यान, राज्यभरातच महापालिकांच्या प्रारूप मतदार यादीत अनेक चुका निदर्शनास आल्या. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 26 नोव्हेंबररोजी सुधारित आदेश काढत प्रारूप मतदारयादीवरील सूचना व हरकतींसाठी मुदत वाढवून दिली. सूचना, हरकतींसाठी अंतिम दिनांक 27 नोव्हेंबरऐवजी 3 डिसेंबर करण्यात आला.
दरम्यान, अंतिम मतदारयादी प्रसिद्धीची तारीख 10 डिसेंबर 2025 होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने 9 डिसेंबर रोजी आदेश काढत, अंतिम मतदार यादी प्रसिद्धीची तारीख 15 डिसेंबर 2025, अशी सुधारित केली आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्धी आता 15 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबररोजी होणार आहे. मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्धी आता 22 डिसेंबरऐवजी 27 डिसेंबररोजी होणार आहे.
दरम्यान, महापौर पदाची आरक्षण सोडत केव्हा निघणार, याकडे इच्छुकांचे तसेच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. नगरविकास विभागाने यासंदर्भात महापालिकेकडून माहिती मागवली आहे. महापौर पदाची यापूर्वीची आरक्षणे, महापालिका क्षेत्राची लोकसंख्या, अनुसूचित जाती, जमाती या प्रवर्गाची लोकसंख्या व या दोन्ही प्रवर्गांसाठी आरक्षित सदस्यसंख्या, याबाबतची माहिती मागवली आहे.