विटा : शेअर मार्केटमध्ये १० हजार रुपयांचे १० लाख रुपये करून देण्याचे आमिष दाखवून खानापूर येथील एका महिलेची २१ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संजीवनी शिवाजी भगत (रा. खानापूर) यांच्या फिर्यादीवरून 'शिव प्रायव्हेट लि. ब्रोकर' कंपनीच्या राजेश नावाच्या व्यक्तीविरोधात विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजीवनी भगत यांच्या मोबाईलवर राजेश नावाच्या एका व्यक्तीने व्हॉट्स ॲप कॉल केला होता. आपण 'शिव प्रायव्हेट लि. ब्रोकर' कंपनीतून बोलत असल्याचे सांगत त्याने संजीवनी यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. सुरुवातीला १० हजार रुपये भरून घेतल्यानंतर त्यावर भरघोस परतावा मिळाल्याचे भासवून राजेशने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. यानंतर, 'तुमचे शेअर्स होल्डवर असून त्यासाठी मार्जिन म्हणून जादा रक्कम भरावी लागेल' अशी बतावणी त्याने केली. त्याच्या आमिषाला बळी पडून संजीवनी आणि त्यांचे पती शिवाजी यांच्या संयुक्त बँक खात्यातून २१ मे ते २२ जून या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांवर तब्बल २१ लाख ७५ हजार रुपये वर्ग करण्यात आले.
पैसे उकळल्यानंतर संशयित राजेशने संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संजीवनी भगत यांनी विटा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, संशयित आरोपीच्या मोबाईल क्रमांकावरून तो परप्रांतीय असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच त्याने फसवणुकीसाठी वापरलेली 'शिव प्रायव्हेट लि. ब्रोकर' ही कंपनी पूर्णपणे बनावट असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या सायबर गुन्ह्याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता विटा पोलिसांसमोर आहे.
दरम्यान, बदनामीच्या भीतीपोटी फिर्यादीच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला या प्रकरणाची वाच्यता न करण्याची भूमिका घेतली होती, मात्र परिसरामध्ये ही घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अनोळखी फोन कॉल्स आणि ऑनलाईन गुंतवणुकीच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.