विटा : विटा पोलिसांनी बुधवारी मोठी कारवाई करत दोन सराईत दुचाकी चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 48 हजार रुपये किमतीच्या एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांच्याकडून विटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
सुशांत उत्तम सोनवणे (वय 25) आणि शुभम किसन भिसे (वय 19, दोघेही रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. खानापूर तालुक्यातील माहुली येथून 26 डिसेंबर 2025 रोजी गणेश पांडुरंग माने यांची दुचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला सूचना दिल्या होत्या. दरम्यान, विटा-खानापूर रस्त्यावरील शिलंगण मैदान परिसरात दोन तरुण विना-नंबरच्या दुचाकीसह थांबल्याची माहिती अंमलदार उत्तम माळी व महेश देशमुख यांना मिळाली.
या आधारे पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी माहुलीसह इतर ठिकाणांहून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक धनंजय फडतरे, संजय हारुगडे, उत्तम माळी, विलास मोहिते, महेश देशमुख, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, अभिजित पाटील व अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.