विटा : येथील चांदी टंच फसवणूक प्रकरणातील संबंधित व्यक्तीच्याबरोबर हुपरीतील (जि. कोल्हापूर) ज्या सराफाने 60 टंचाचे प्रमाणपत्र दिले त्याच्यावरही गुन्हा दाखल होणार का, हा प्रश्न आहे. विट्यातील मायणी रस्त्यावरील चांदीच्या शोरूममध्ये परगावातून आलेल्या एकाने 60 टंचाची चांदी असल्याचे सांगून 20 टंच शुद्ध चांदी दिली. त्याने तेवढ्याच टंचाचे आणि वजनाचे तयार दागिने खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्या शोरूममधील सराफाच्या सतर्कतेमुळे फसवणुकीचा हा प्रकार उघड झाला.
कमी टंचाची चांदी देताना जादा टंच आहे, असे कागदोपत्री दाखवून सराफांकडून तयार दागिने न्यायचे, अशी टोळीच असल्याच्या चर्चा आता होत आहेत. असे प्रकार केवळ विट्यातच नव्हे तर देशभरात होत असल्याची चर्चा होते आहे. याचे एक कारण असे सांगितले जाते की, खानापूर, आटपाडी, तासगाव, माण, खटाव वगैरे भागातील हजारो लोक गलाई व्यवसायाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात पसरलेले आहेत. त्यामुळे आता कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा ते दिल्ली आणि थेट काश्मीरपासूनच्या गलाई व्यावसायिक दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्कात आहेत.
मूळच्या खानापूर तालुक्यातील एका गलाई व्यावसायिकाला तामिळनाडूतील सेलममध्ये अशाच प्रकारच्या फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. तब्बल 73 किलो कमी टंचाची चांदी त्याच्या गळ्यात मारून दोघेजण पसार झालेत. हा प्रकार नुकताच घडला, मात्र सेलमचे पोलिस संबंधित गलाई व्यावसायिकास ‘तुम्ही इथे तक्रार न करता हुपरीमधील पोलिस ठाण्यात तक्रार करा’ असे सांगत आहेत. वास्तविक जेथे गुन्हा घडला तेथे तक्रार नोंद झाली पाहिजे, असा कायदा आहे. परंतु तेथील पोलिस सांगतात, संबंधित त्या दोघांनी जर हुपरीमधील सराफाकडून टंचाचे प्रमाणपत्र आणले असेल, तर मूळ गुन्हा त्यानेच केला आहे. म्हणजे थोडक्यात, तिकडचे पोलिस अशा प्रकारच्या फसवणुकीची दखल गांभीर्याने घेत नाहीत का? आता विट्यातल्या फसवणूक प्रकारात चांदीच्या पट्ट्यांच्या बदल्यात दागिने घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने पट्ट्यांच्या सोबत हुपरी येथील टंचाचे प्रमाणपत्रही दाखवले होते. याप्रकरणी विटा पोलिसांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे म्हणणे मागितले आहे, त्यानुसार कार्यवाही करू, असे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले आहे.
कोणत्याही धातूची शुद्धता किती आहे, हे तपासण्यासाठी जी प्रक्रिया करतात, त्यास त्या धातूचा टंच काढणे म्हणतात. बहुतेक करून सोने किंवा चांदी या दोनच धातूंचा टंच काढला जातो. कारण तुलनेत हे दोन्ही धातू अशुद्ध स्वरूपात सापडतात आणि त्यांचे दर जास्त आहेत. त्यातही चांदीचा टंच काढला जातो. चांदीत तांबे किंवा अन्य धातू मिसळलेले असू शकतात. टंच काढण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये एक्स-रे फ्लोरोसंस नावाचे यंत्र निघाले आहे. मात्र पारंपरिक पद्धतीने त्या धातूची आम्लासोबत रासायनिक प्रक्रियेद्वारे चांदी आणि इतर धातू वेगळे करतात. यात समजा एक किलो चांदी असेल, तर त्यातला एक ग्रॅमचा तुकडा काढतात, तो एका काचेच्या नळीत टाकून त्यात काही आम्लाचे थेंब टाकतात. असे केल्याने चांदी आणि इतर धातू वेगवेगळे होतात आणि एक ग्रॅममध्ये शुद्ध चांदी किती ग्रॅम निघाली, त्यानुसार त्याचा टंच ठरतो.
घेतलेले सोने किंवा चांदी किती टंचाची आहे हे ग्राहकाला कळणे अशक्य असते. त्यामुळे खरेदी करताना विक्रेत्याकडून टंच फॉर्म किंवा टंच प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. त्या प्रमाणपत्रावर दुकानाचे नाव, शिक्का, सिरीयल क्रमांक असतो. तोच क्रमांक आणि दुकान नावाचा शिक्का घेतलेल्या संबंधित धातूच्या तुकड्यावर किंवा दागिन्यांवर असतो. अलीकडच्या काळात हॉलमार्क प्रमाणपत्र दिले जाते. त्यातही या सर्व गोष्टी असतात.