Vita Powerloom Worker News
विटा : किमान वेतनासाठी कायदेशीर लढा देणारे विट्यातील यंत्रमाग कामगार राजेंद्र दिवटे यांना तब्बल १३ लाख २० हजार ७९२ रुपयांचा वेतन फरक मिळणार आहे. न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित यंत्रमाग मालकाकडून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश विटा तहसीलदारांना दिले आहेत. त्यानुसार महसूल नियमांनुसार वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
राजेंद्र दिवटे हे २०१६ पर्यंत संजय रामचंद्र कदम यांच्या यंत्रमाग कारखान्यात काम करीत होते. किमान वेतनाची मागणी केल्यामुळे त्यांना डिसेंबर २०१६ मध्ये कामावरून कमी करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी किमान वेतन आणि थकीत वेतनाच्या मागणीसाठी कायदेशीर लढा सुरू केला.
या प्रकरणात न्यायालयाने दिवटे यांना देय असलेली रक्कम देण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित मालकाने न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी केली नाही. त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त श्री. एलगुंडे यांच्या शिफारशीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने विटा तहसीलदारांनी महसूल नियमांनुसार वसुलीची कारवाई सुरू केली आहे.
त्यानुसार यंत्रमाग मालक संजय रामचंद्र कदम यांच्याकडून राजेंद्र दिवटे यांना देय असलेली १३ लाख २० हजार ७९२ रुपयांची रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र लाल बावटा जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून दिवटे यांच्या हक्कासाठी हा लढा लढण्यात आला. युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉ. शंकर पुजारी यांनी यंत्रमाग कामगारांना किमान वेतन, ओव्हरटाईम तसेच सामाजिक सुरक्षा लाभ मिळवून देण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले आहे.
आगामी दिवाळीपूर्वी प्रत्येक यंत्रमाग कामगाराला एक महिन्याचा बोनस आणि एका महिन्याच्या पगारी रजेचा पगार, असे एकूण दोन महिन्यांचे वेतन मिळावे, अशी मागणीही कॉ. पुजारी यांनी केली आहे. कामगारांना कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्यांनी युनियनशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.